नवी दिल्ली – बर्थ कंट्रोल पिल्स (Birth conrtrol pills) अथवा गर्भनिरोधक गोळ्या याबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत, ज्यावर त्या डोळे झाकून (सहज) विश्वास ठेवतात. काही महिलांना असं वाटतं की त्यांनी जास्त प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या तर त्यांना वंध्यत्व येईल व त्यांना पुन्हा कधीही गर्भधारणा होणार नाही. तसेच या गोळ्या जास्त प्रमाणात सेवन केल्याने हार्मोनल असंतुलन (hormonal imbalance) होते असेही अनेक लोकांना वाटते. गर्भधारणेशी (pregnancy) संबंधित मिथक आणि नेमकं सत्य काय आहे, याबद्दल तज्ज्ञांनी काय सांगितले आहे, त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
1) जास्त गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने वंध्यत्व येऊ शकते का ?
गर्भनिरोधक औषधांचा वापर केल्यामुळे वंध्यत्व येते हा एक गैरसमज आहे. स्त्रियांच्या शरीरात अंडी तयार करणे थांबवणे, केवळ एवढेच गर्भनिरोधक गोळ्यांचे काम आहे. त्यामुळेच गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केल्यामुळे वंध्यत्व येते हा एक मोठा गैरसमज आहे. यामुळे कोणत्याही महिलेला अजिबात वंध्यत्व येत नाही. खरंतर गर्भनिरोधक गोळ्या या अतिशय उत्तम गर्भनिरोधक असल्यामुळे नको असलेली गर्भधारणा टाळता येते.
2) गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रभाव किती काळ टिकतो ?
एखादी स्त्री जितका काळ या गोळ्या घेईल, तेवढाच वेळ या औषधाचा परिणाम टिकतो. ज्या क्षणी महिलेने ही (गर्भनिरोधक) गोळी घेणे थांबवले, त्याच क्षणी या गोळीचे शरीरातील परिणामही संपुष्टात येतात. त्यामुळेच स्त्रीच्या शरीरात अंडी पुन्हा तयार होतात व त्या महिलेची प्रजनन क्षमता पूर्ववत होते.
3) गर्भनिरोधक गोळी घेणे बंद केल्यावर महिला कधी गरोदर राहू शकते ?
गर्भनिरोधक गोळीचे सेवन करणे बंद केल्यानंतर पहिल्या महिन्यातच गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय, त्यासाठी महिलेची मासिक पाळीही नियमितपणे येणे आवश्यक असते.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)