Mango Benefits: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे फळ म्हणजे आंबा (Mango). मधुर चव आणि रसाळ असणारा हा आंबा फळांचा राजा म्हणूनही ओळखला जातो. आज (22 जुलै) ‘नॅशनल मँगो डे’ (National Mango Day) आहे. हा दिवस साजरा करण्यास कधीपासून सुरूवात झाली, याची निश्चित माहिती नसली तरी आंब्याचा इतिहास अतिशय समृद्ध आहे. भारतात , सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी पासून आंब्याची लागवड केली जात होती, असे म्हटले जाते. गोड, रसाळ, मन मोहून घेणाऱ्या सुवासित आंबा दिसल्यावर कोणालाही तो खाण्याचा मोह होतोच. लहान मुलं असोत वा मोठी माणसं किंवा वृद्ध व्यक्ती सर्वांनाच आंबा, पोटभरून नव्हे तर मनभरून खायला आवडतो ! आंबा न आवडणारी व्यक्ती विरळाच. मात्र ज्यांना हे फळ खायला आवडत नसेल, त्यांनाही आंब्याचे शरीराला होणारे फायदे (Benefits of eating Mango) कळले , तर तेही आंबा खाण्यास सुरूवात करतील. आंबा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतो. जाणून घेऊया त्याचे फायदे..
आंबा हे फळ असं आहे, जे तुम्ही हरप्रकारे खाऊ शकता. नुसता चोखून, फोडी करून, त्याचा रस काढून आमरस-पुरीचा आस्वाद घेऊ शकता. एवढेच नव्हे तर मँगो ज्यूस, स्मूदी , मँगो केक किंवा त्याचे आईस्क्रीमही सर्वांनाच आवडते. कच्चा आंबा अर्थात कैरीच्याही अनेक पाककृती असतात. कैरीची चटणी, आंबेडाळ किंवा भेळेत घातलेली कैरी, यामुळे पदार्थांचा स्वाद अजूनत वाढतो. त्यामुळे फळांच्या या राजाचा, तुम्ही मनमुराद आनंद लुटू शकता आणि ‘नॅशनल मँगो डे’ साजरा करू शकता.
आंब्यात खूप पोषक तत्वे असतात. त्यामध्ये फॉस्फरस, डायटरी फायबर, प्रोटीन, पोटॅशिअम, जस्त ( झिंक), कार्बोहायड्रेट्स, कॅल्शिअम, आयर्न, थायमिन, नियासिन, रायबोफ्लेविन यासह अनेक व्हिटॅमिन्स असतात. जी चांगल्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आणि पोषक असतात.