नवी दिल्ली – फळं आणि भाज्यांमध्ये (vegetables) पोषक तत्वं (nutrition) भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. ज्यामुळे शरीरातील जीवनसत्वांची कमतरता पूर्ण होते. मात्र बहुतांश वेळेस लोकं भाज्यांचे साल (vegetable peels) काढून मग त्यांचे सेवन करतात. मात्र काही भाज्या अशाही असतात ज्यांची सालं खाणं हे लाभदायक ठरतं. त्या भाज्यांची सालं काढली तर त्यातील पोषक तत्वं नष्ट होतात. त्या भाज्या कोणत्या हे जाणून घेऊया.
1) बटाटा
बटाटे खायला सगळ्यांनाच आवडतं, विशेषत: लहान मुलं तर मोठ्या उत्साहाने बटाटे खातात. त्याला भाज्यांचा राजाही म्हटलं जातं. बटाटा कोणत्याही भाजीत घालून खाऊ शकतो. त्याची सालही पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. त्यात पोटॅशिअम, लोह, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए आणि इतर अनेक गुणधर्म असतात, त्यामुळे बटाट्याचे सेवन सालासह केलेले चांगले ठरते.
2) मुळा
हिवाळ्यात मुळा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. तो खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. काही लोक मुळ्याचे साल काढून मग त्याचे सेवन करतात, पण त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वं मिळत नाहीत. तुम्ही सालासह मुळा खाऊ शकता, त्यात फायबर, पोटॅशिअम, झिंक, कॅल्शिअम आणि अनेक जीवनसत्त्वे असतात, ज्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.
3) काकडी
काकडी सहसा सॅलॅड स्वरूपात खाल्ली जाते. बरेचदा लोक काकडीचे साल काढून खातात. मात्र काकडी सालासह खाल्ल्याने अधिक फायदा होतो. यामध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. जे आपल्या शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण करतात.
4) रताळं
रताळ्याच्या सालीमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई आणि बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. जर तुम्ही रताळ त्याच्या सालासह खाल्ले तर ते डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास मदत करते. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
5) भोपळा
भोपळा ही भाजी म्हणजे आरोग्याचा खजिना मानला जातो. बरेच लोक तो सालीसोबत खातात, तर काही लोक भोपळ्याचे साल काढून खाणे पसंत करतात. त्यात व्हिटॅमिन-ए, लोह, पोटॅशिअम आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात, त्यामुळे सालीसह भोपळा खाल्यास तो आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)