नवी दिल्ली : जसजसा उन्हाळा (summer) वाढू लागला आहे, त्याचा दाहही (heat in summer) वाढतोय. उन्हाळ्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. उन्हामुळे गरगरणे, डोके दुखी अशा त्रासासह काही वेळेस नाकातून रक्तस्त्रावही (Nose Bleeding) होतो. उन्हाळ्यात तापमान वाढले की हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नाकात कोरडेपणा येतो. नाकात कोरडेपणा आल्याने शिरा कोरड्या होतात किंवा त्या फुटून जखमा होतात. त्यामुळे नाकातून रक्तस्त्राव सुरू होतो. कोरडेपणामुळेही रक्तस्त्राव होण्याची समस्या असू शकते.
नाकातून रक्तस्त्राव होण्याची ही समस्या 3 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये जास्त आढळते. पण वृद्ध लोकही या समस्येने त्रस्त होऊ शकतात. नाकातील ॲलर्जी, अंतर्गत शिरा किंवा रक्तवाहिन्या खराब होणे, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, रक्तदाब, अति उष्णता, जास्त शिंका येणे, सर्दी किंवा नाक वेगाने घासणे यामुळेही हा त्रास उद्भवू शकतो.
करून पहा हे उपाय, होणार नाही रक्तस्त्राव
शरीर हायड्रेटेड ठेवावे
कडक उन्हामुळे शरीराला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा. शक्य तितके पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरातून जास्त घाम येत असल्याने पाण्याची कमतरता भासते. म्हणून, द्रव पदार्थांचे अधिक सेवन करावे. साधे पाणी पिण्याव्यतिरिक्त नारळ पाणी, फळांचे ज्यूस , सरबत वगैरे पिऊ शकता.
हे पदार्थ चुकूनही खाऊ नका
उन्हाळ्यात गरम अर्थात उष्ण पदार्थ खाऊ नयेत. गरम पदार्थ खाल्ल्याने नाकातील रक्तवाहिन्यांवर दाब पडतो. त्यामुळे नाकातून रक्त येऊ लागते. त्यामुळे उन्हाळ्यात उष्ण प्रकृतीचे, गरम, तसेच मसालेदार पदार्थ शक्यतो टाळावेत. जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.
गार अथवा गरम पॅकचा करा वापर
जेव्हाही नाकातून रक्तस्त्राव होत असेल तेव्हा थंड किंवा गरम पॅक वापरा. थंड पॅक नाकाच्या वर ठेवावा, तर गरम पॅक नाकाच्या खाली ठेवावा. यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब कमी होतो आणि रक्तस्त्राव थांबतो.