नवी दिल्ली – आपले राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या सवयी यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर (effect on health) होतो. आजकाल झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक विकासावर खूप परिणाम होत आहे. अशा वेळी थोडासाही निष्काळजीपणा केल्यास तो आपल्यासाठी फारच घातक ठरू शकतो. खराब जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. किडनी स्टोनही (kidney stone) याच आजारांपैकी (health disease) एक आहे. काही काळापासून अनेक लोकांना किडनी स्टोन होण्याची समस्या सतत वाढत आहे.
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हा त्रास सहन करावा लागतो. या आजाराला वैद्यकीय भाषेत नेफ्रोलिथियासिस (Nephrolithiasis) किंवा युरोलिथियासिस (Urolithiasis) असे म्हणतात. वेळीच हा आजार ओळखून त्यावर उपचार केल्यास फायदा होतो.
किडनी स्टोन म्हणजे नेमके काय ?
हा त्रास असलेल्या व्यक्तीच्या किडनीमध्ये स्टोन तयार होतो. शरीरामध्ये जेव्हा किडनी स्टोन हळूहळू तयार होऊ लागतो तेव्हा मूत्राशयातील (Bladder) मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो आणि परिणामी संबंधित व्यक्तीला लघवी करण्यास जळजळ होणे, आग होणे, प्रचंड प्रमाणात वेदना होणे, अशा अनेक समस्या व लक्षणे जाणवतात. ही अतिशय वेदनादायी अवस्था असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, किडनी स्टोनचा थेट परिणाम आपल्या मूत्रमार्गावर होतो. शरीरामध्ये किडनी स्टोन निर्माण होण्याची कारणे वेगवेगळी असतात. पण जर आपल्या शरीरामध्ये खनिजे आणि क्षार पदार्थ यांची मात्रा वाढल्यास शरीरामध्ये किडनी स्टोन तयार होऊ लागतो.
किडनी स्टोनचे प्रकार
– स्ट्रवाइट स्टोन
– कॅल्शिअम स्टोन
– सिस्टीन स्टोन
– यूरिक ॲसिड स्टोन
किडनी स्टोनची लक्षणे
– लघवी करताना दुर्गंध येणे
– लघवी करताना रक्त येणे
– ताप येऊन उलटी होणे
– मूत्रमार्गात इन्फेक्शन होणे
– सामान्य स्तरापेक्षा अधिक लघवी होणे
– लघवी करताना वेदना होणे
किडनी स्टोन होण्याची कारणे
शरीरातील पाण्याची कमतरता
अनेकदा निष्काळजीपणामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट तर राहतेच पण त्यामुळे किडनी स्टोनचा धोकाही कमी होतो. खरं सांगायचं तर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्यामुळेही अनेकदा किडनी स्टोन होऊ शकतो.
औषधांचे सेवन
काही वेळा अनेक प्रकारच्या औषधांचे सेवन केल्यानेदेखील किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. विशेषतः एचआयव्हीच्या उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते.
जुने आजार
बऱ्याच वेळेस जुनाट आजार हे देखील किडनी स्टोन होण्यास कारणीभूत ठरू शकतात. खरंतर, सिस्टिक फायब्रॉइड्स, इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज आणि ट्यूबरल ॲसिडोसिस यांसारख्या रोगांमुळेदेखील किडनी स्टोन होऊ शकतो.
एस्ट्रोजनची कमतरता
महिलांमध्ये एस्ट्रोजन नावाचे एक हार्मोन असते. ज्या महिलांमध्ये एस्ट्रोजनची कमतरता आढळते, त्यांना किडनी स्टोन होण्याची शक्यता सर्वात अधिक असते. तसेच ज्या महिलांची ओव्हरी (अंडाशय) काढण्याचे ऑपरेशन झाले असेल त्यांनाही किडनी स्टोन होण्याचा धोका असतो.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)