नवी दिल्ली : आजकालची टेक्नोसॅव्ही पिढी सतत गॅजेट्समध्ये घुसलेली असते. कानात ब्ल्यूटूथवाले किंवा वायरलेस हेडफोन्स, हातात स्मार्टफोन आणि मनगटावर स्मार्टवॉच… हे दागिने सतत अंगाखांद्यावर रुळत असतात. आजकाल बहुतेक लोकांना स्मार्टवॉच (Smartwatch)वापरायला आवडते. कारण त्यात अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी लोकांना त्याकडे आकर्षित करतात. त्यामुळे व्यक्ती स्मार्ट आणि स्टायलिश तर दिसतेच तसेच वेळेसोबत त्यामध्ये अशी अनेक फीचर्सही (features)आहेत ज्यामुळे आरोग्यासंदर्भातील अनेक संकेत मिळतात. आजकाल अनेक स्मार्टवॉचमध्ये फिटनेस ट्रॅकर (fitness tracker)तसेच हार्ट रेट मॉनिटर फीचर देखील आहे, जो तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगू शकतो. कदाचित तुम्हीसुद्धा असे एखादे स्मार्टवॉच वापरत असाल.
पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की डॉक्टरांनी स्मार्टवॉचबद्दल इशारा देत असे सांगितले आहे की स्मार्टवॉचमुळे लोकांवर वाईट मानसिक परिणाम होऊ शकतात. कारण अलीकडे लोकांनी स्मार्टवॉचद्वारे मिळणारे संकेत अथवा इंडिकेशन यांचा आरोग्याशी संबंध जोडायला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर स्मार्टवॉचचे दुष्परिणाम दर्शवणारे एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे.
हे प्रकरण एका 27 वर्षीय स्विस-जर्मन तरूणाचे आहे. या व्यक्तीला प्रथम कोणताही आजार नव्हता, तो अगदी ठणठणीत होता. मात्र तरीही स्मार्टवॉचमुळे त्याला तणाव आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागला. याचे कारण म्हणजे, त्याने त्याच्या स्मार्टवॉचच्या इलेक्ट्रोकार्डिओग्रॅमवर सतत लक्ष ठेवणे सुरू केले होते. ज्यामुळे त्याला त्याच्या छातीत दुखत असल्यासारखे वाटू लागले. एवढंच नव्हे तर त्याला हृदयातील रक्तप्रवाहाची गती कमी होत आहे, अशी शंकाही येऊ लागली. या भीतीने त्या तरूणाने सरळ रुग्णालयातच धाव घेतली.
तिथे तपासण्या केल्यानंतर असे आढळले की त्याच्या स्मार्टवॉचचे इलेक्ट्रोकार्डिओग्राम आणि 12 लीड इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG) हे तंतोतंत समान आहेत. त्याचा अर्थ असा होता की स्मार्टवॉच आणि ईसीजीचा अहवाल पूर्णपणे बरोबर होता. तो तरूण अगदी बरा होता. त्याला हृदयाशी निगडीत कोणताही आजार झालेला नव्हता. डॉक्टरांनी त्या तरूणाची नीट समजूत काढत तो ठणठणीत बरा असल्याचे पटवून दिले व त्याला रुग्णालयात डिस्जार्ज दिला. तसेच त्याला कोणत्याही उपचारांची गरज नसल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले.
हृदयाच्या आरोग्यावर ठेवू लागले लक्ष
मेडिकल केस रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, या तरूणाने आपल्या हृदयाचे (heart health) आरोग्य तपासण्यासाठी स्मार्टवॉच खरेदी केले होते. डॅनिश फुटबॉलपटू क्रिश्चिअन एरिक्सन याला एका मॅचदरम्यान कार्डिॲक अरेस्ट आला होता. तेव्हा तो तरूण घाबरला व त्याने स्मार्टवॉच खरेदी केले आणि हृदयाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली.
स्मार्टवॉचमधील इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG) मॉनिटरवर हार्ट ॲटॅक आल्याचे कसे कळेल हे त्याने गुगलवर सर्च केले होते. खरंतर ECG ही एक साधी, सोपी चाचणी आहे, ज्याचा उपयोग तुमच्या हृदयाची गती आणि इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी तपासण्यासाठी केला जातो.
विद्युत क्रिया तपासण्यासाठी केला जाऊ शकतो.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, रुग्णालयात आलेला हा तरूण खूप अस्वस्थ होता. तो अतिशय चिंतेत आणि घाबरलेला दिसत होता. इमर्जन्सी विभागातील पुढील तपासणीत असे आढळून आले की विद्यार्थ्याचा हार्ट रेट 88 बीट्स प्रति मिनिट (बीपीएम) अर्थात नॉर्मल होता आणि त्याला हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती.
स्मार्टवॉचचा वापर करणे धोकादायक आहे का ?
तज्ज्ञांनी यापूर्वीही अनेक वेळेस स्मार्टवॉचचा प्रभाव आणि त्याची परिणामकारकता यावर प्रश्न उपस्थित केला आहे. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, यामुळे वजन वाढू शकते. 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये असे आढळून आले की ज्या लोकांनी एक वर्ष फिटबिटचा वापर केला त्यांचे वजन किंवा रक्तदाबात कोणताही बदल झालेला दिसला नाही. द लॅन्सेटच्या अहवालानुसार, तज्ञांनी सांगितले की ट्रॅकर्सचे फीचर्स असूनही वैशिष्ट्य असूनही, स्मार्टवॉच हीी आपले आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात, याबाबत फार कमी पुरावे समोर आहेत.