नवी दिल्ली : ‘ घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी ‘ अशी एक म्हण आपणा सर्वांनाच माहिती आहे. याचा अर्थ असा की प्राणी-पक्षी असोत वा माणसं, कामासाठी बाहेर पडले तरी पालकांना (parents) घराची, आपल्या मुलांची सदैव काळजी असते. मनाने ते तिथेच गुंतलेले (care) असतात. पण हळूहळू पिल्लं किंवा माणसांची मुलं मोठी होतात आणि एकेदिवशी घराबाहेर झेप घेतात. एकत दिवस असा येतो की मुलं बाहेर काम करत असतात, शिकत असतात आणि त्यांचे थकलेले, वयस्कर आई-वडील घरात (parents at home) असतात. भूमिका बदलतात, पण आई-वडिलांचे तेव्हाही संपूर्ण लक्ष मुलांकडेच लागलेले असते.
मात्र काही कारणांमुळे मुलं रोज त्यांच्यासोबत राहू शकत नााहीत. काही नोकरीसाठी तर काही शिक्षणासाठी, इतर कामासाठी बाहेर गावी किंवा दुसऱ्या देशात रहायला जातात. अशावेळी आई-वडील घरात एकटे पडतात. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम दिसून येतो आणि ते अस्वस्थ होतात. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव आणि चिंतेच्या रेषा दिसू लागतात. हा एकटेपणा आणि रिकामेपणा याला ‘एम्प्टी नेस्ट सिंड्रोम’ असे म्हणतात. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी याचा सामना करावाच लागतो. पण सर्वांनाच तो झेपतो असे नाही. अशा वेळी यापासून बचाव करून स्वत:चे मानसिक आरोग्य कसे जपावे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
एम्प्टी नेस्ट सिंड्रोमची लक्षणे
एम्प्टी नेस्ट सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला कमी झोप येते. चेहऱ्यावर उदासी जाणवते. कधी कधी अशा व्यक्तींना खूप राग येतो. यादरम्यान ते स्वत:चे नुकसान करण्याचाही प्रयत्न करू शकतात. याशिवाय तणाव, चिंता, एकटेपणा यासारख्या समस्या आहेत.
एम्प्टी नेस्ट सिंड्रोमपासून असा करावा बचाव
जर तुम्हाला एम्प्टी नेस्ट सिंड्रोमची लक्षणे जाणवत असतील तर याचा अर्थ तुम्ही या समस्येने ग्रस्त आहात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
– तुम्हाला एकटेपणा वाटत असेल तर मुलांच्या आणि नातेवाईकांच्या संपर्कात रहा. मुलं बाहेर राहत असतील तर ते फोनद्वारे जोडले जाऊ शकतात. सोशल मीडियाचा वापरही प्रभावी ठरू शकतो. तुम्ही त्यांना नियमितपणे व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी बोलू शकता. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही दर सहा महिन्यांनी त्यांना भेटू शकता.
– नेहमी सकारात्मक रहा. आजकाल लोक नकारात्मक आणि तणावपूर्ण जीवन जगू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यासाठी नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आवडतील त्या गोष्टी करा. नवीन छंद जोपासा. सोप्या शब्दात, तुमच्या मनाल आवडेल, आनंद मिळेल असे काम करा. बाहेर जा, फिरा, मनसोक्त जगा.
– तुमचे मित्र आणि नातेवाईकांशी बोला आणि तुमच्या आयुष्याबद्दल प्रतिक्रिया घ्या. जर तुम्हाला बरे वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.