Cardiac Arrest vs Heart Attack : कार्डिॲक अरेस्ट आणि हार्ट ॲटॅकमधील फरक माहित्ये का?; दोघांपैकी कोणता ॲटॅक जीवावर बेतणारा?

| Updated on: Mar 10, 2023 | 10:03 AM

कार्डिॲक अरेस्ट आणि हार्ट ॲटॅक हे दोन्ही खूप वेगळे आहेत. कार्डिॲक अरेस्टमध्ये व्यक्तीवर लगेच उपचार झाले नाही तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. या दोहोंमध्ये काय फरक आहे, ते जाणून घेऊया.

Cardiac Arrest vs Heart Attack :  कार्डिॲक अरेस्ट आणि हार्ट ॲटॅकमधील फरक माहित्ये का?; दोघांपैकी कोणता ॲटॅक जीवावर बेतणारा?
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे नुकतेच कार्डिॲक अरेस्टमुळे निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. सतीश कौशिक जिममध्ये व्यायाम करत तासनतास घाम गाळत होते. असे असतानाही हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व आश्चर्य व्यक्त होत आहे. सतीश कौशिकच का… गेल्या काही काळात असे अनेक सेलिब्रिटी कार्डिॲक अरेस्टची (Cardiac Arrest) शिकार झाले आहेत, जे नियमितपणे जिममध्ये जायचे आणि फिट (fit) होते. मग ते राजू श्रीवास्तव असोत किंवा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला.

गेल्या काही वर्षांपासून हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसं पहायला गेलं तर कार्डिॲक अरेस्टमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये वृद्धांपेक्षा युवा तरूणांची संख्या जास्त आहे. जिथे पूर्वी हृदयविकाराची प्रकरणे दीर्घायुष्यानंतर समोर येत होती, तिथे आजकाल तरुणांमध्येही अशा केसेस दिसून येत आहेत.

कोरोनानंतर ह्रदयविकाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून युवकही त्याला बळी पडत आहेत. धडकी भरवणारी गोष्ट म्हणजे कार्डिॲक अरेस्टमध्ये हृदयाचे ठोके अचानक बंद होतात आणि तातडीने उपचार न मिळाल्यास मृत्यू होतो. अशा परिस्थितीत, काही लोकं कार्डिॲक अरेस्ट आणि हार्ट ॲटॅक यातील फरकाबद्दल संभ्रमात राहतात. पण त्या दोहोंमध्ये बरेच अंतर आहे. जर तुम्हालाही असे कन्फ्युजन जाणवत असेल तर या दोघांमधील महत्वाचा फरक जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

कार्डिॲक अरेस्ट म्हणजे काय ?

खरंतर कार्डिॲक अरेस्टमध्ये एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके अचानक बंद होतात. अशा स्थितीत शरीराच्या इतर भागाला रक्तपुरवठा करणे शक्य होत नाही. या दरम्यान व्यक्ती बेशुद्ध पडते. त्याला तातडीने उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू होतो.

कार्डिॲक अरेस्ट येण्याची कारणे कोणती ?

कार्डिॲक अरेस्टबद्दल सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे कोणतीही व्यक्ती त्याचा बळी होऊ शकतो. मग ती व्यक्ती लहान मूल असो, तरूण असो किंवा म्हातारा माणूस. याला काही कारणेही कारणीभूत ठरतात. उदा – एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे स्नायू कमकुवत झाले असतील किंवा कधीकधी हृदयविकाराचा झटका देखील याचे कारण बनते. कार्डिॲक अरेस्ट आल्यावर त्या व्यक्तीवर तातडीने उपचार झाले नाहीत तर त्याला जीव गमवावा लागू शकतो.

हार्ट ॲटॅक म्हणजे काय ?

हार्ट ॲटॅक हा कार्डिॲक अरेस्टपेक्षा खूप वेगळा आहे आणि तो कार्डिॲक अरेस्टपेक्षा कमी धोकादायक असतो. जेव्हा मानवाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो किंवा धमन्या 100% ब्लॉक होतात, तेव्हा माणसाला हार्ट ॲटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येतो.

हार्ट ॲटॅक आल्यास काय होतं ?

हार्ट ॲटॅक येण्यापूर्वी माणसाला अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. यापैकी, छातीत दुखणे किंवा छातीत जडपणा जाणवणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे. याशिवाय श्वास लागणे, घाम येणे किंवा उलट्या होणे ही देखील सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे लगेच किंवा काही तासांनंतर दिसून येतात.

हार्ट ॲटॅक येण्याचे कारण काय ?

आपली खराब जीवनशैली ही हार्ट ॲटॅकसाठी कारणीभूत ठरू शकते. जर तुमची जीवनशैली योग्य नसेल तर तुम्ही स्वतःला अशा गंभीर हृदयविकाराकडे घेऊन जाता. आजकाल लोकांचे चुकीचे खाणे किंवा पुरेशी झोप न घेणे किंवा धू्म्रपान करणे, व्यायाम न करणे हे हार्ट ॲटॅकचे सामान्य कारण असू शकते.

कार्डिॲक अरेस्ट आणि हार्ट ॲटॅक टाळण्याचे काही उपाय

कार्डिॲक अरेस्ट टाळण्यासाठी काही पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो. हृदयाची योग्य काळजी घेतल्यास हृदयाशी संबंधित आजार टाळता येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी जीवनशैली निरोगी ठेवा, योग्य आहार घ्या, दररोज व्यायाम करा, वजन नियंत्रित ठेवा, तणाव टाळा, धूम्रपान-दारूचे सेवन करू नका, वेळोवेळी डॉक्टरांशी संपर्क साधत रहा.

जर एखाद्या व्यक्तीला कोरोनरी धमनी रोग किंवा हृदयाशी संबंधित इतर कोणताही आजार असेल तर वेळोवेळी तपासणी करून घ्या. जर एखाद्याला कार्डिॲक अरेस्ट आला असेल, तर हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी इम्प्लांट करण्यायोग्य कार्डिओव्हर्टर डिफिब्रिलेटर घरी ठेवा. त्यामुळे जोखीम कमी होऊ शकते.