Diarrhea : अन्न हे पूर्णब्रह्म असतं… अन्नामुळे पोषण होतं, ताकदही मिळते. मात्र कोणताही पदार्थ एका ठराविक प्रमाणात खाणे फायद्याचे असते, अन्यथा त्यामुळेही तोटे सहन करावे लागू शकतात. डायरिया (Diarrhea) किंवा अतिसार ही पोटाशी संबंधित समस्या आहे. साधारणत: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हा त्रास उद्भवू शकतो. एकद का ही समस्या सुरू झाली की रुग्ण अगदी गळून जातो. डायरियामुळे त्या व्यक्तीला अतिशय थकवा येतो, तसेच सुस्तही वाटू लागते. अशा वेळी एनर्जी लेव्हलही कमी होते.
अशा परिस्थितीत खाण्यापिण्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. डायरियामुळे पोटात काही रहात नाही, शरीरात पाण्याची कमतरताही जाणवू लागते. अशावेळी काय खावे आणि मुख्य म्हणजे काय खाऊ नये याकडे नीट लक्ष देणे व त्याप्रमाणे पालन करणे हे महत्वाचे ठरते. जेव्हा तुम्हाला जुलाब किंवा डायरिया होतो तेव्हा तुम्ही यापैकी काही पदार्थ खाऊ शकता. मात्र काही गोष्टी खाणे पूर्णपणे टाळावे.
काय खावे ?
उकडलेला बटाटा
डायरिया झाल्यास उकडलेला बटाटा मॅश करून खाऊ शकता. ते खाल्ल्याने तुम्हाला एनर्जी मिळते. तसेच डायरियाच्या समस्येपासून आरामही मिळतो.
केळं
केळं हे अतिशय पौष्टिक फळ आहे. डायरियाचा त्रास होत असेल तर तुम्ही केळं देखील सेवन करू शकता. त्यात मुबलक पोटॅशिअम असते. तसेच केळी ही पचायलाही हलकी असतात. केळ्यांचे सेवन केल्याने इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता दूर होते. म्हणूनच अतिसार झाल्यावर तुम्ही केळं खाऊ शकता.
शहाळ्याचे पाणी
डायरियामुळे पोट बिघडते तेव्हा नारळाचे किंवा शहाळ्याचे पाणी पिणे हा उत्तम पर्याय ठरतो. ते प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. म्हणूनच अतिसार झाल्यास नारळाचे पाणी प्यावे.
दही
दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया आपल्या आरोग्याला अतिशय फायदेशीर ठरतात. यामुळे आपली रिकव्हरी लवकर होते. डायरियामुळे गळून गेला असाल तर दही नक्की खावे.
ऋतूमानानुसार येणाऱ्या भाज्या
डायरियाचा त्रास होत असेल तर पचायला सोपे, हलके पदार्थ खावेत. तुम्ही दुधी भोपळा, पडवळ अशा भाज्या खाऊ शकता. त्या खाल्ल्याने तुमच्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्वं मिळतात.
काय खाऊ नये ?
अतिसार किंवा डायरिया झाल्यास दुग्धजन्य पदार्थ खाऊ नयेत. ही उत्पादने खाल्ल्याने पचन आणखी खराब होऊ शकते. त्यामुळे पोटाशी संबंधित त्रास असेल तर दूध, चीज किंवा आईस्क्रीम खाणे टाळावे. तसेच अशावेळी जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. त्याऐवजी पचायला हलक्या पदार्थांचे सेवन करणे योग्य ठरते.
डायरिया झाल्यास तळलेले पदार्थ आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ घेणे टाळावे. आपल्यापैकी अनेकांना कॉफी आणि चहा जास्त पिण्याची सवय असते. पण यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. पोटाचा त्रास असेल तर कॅफिनयुक्त पदार्थ खाणे टाळावे. तसेच अती साखरयुक्त आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणेही योग्य ठरत नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)