ऐटीत करताय ‘IT’ त काम ? सांभाळा, आयटीवाल्यांना हा आजार होण्याचा धोका सर्वाधिक

| Updated on: Mar 09, 2023 | 12:07 PM

आयटी क्षेत्रात काम करणारे तरुण 8 ते 10 तास बसतात आणि भूक लागल्यावर फास्ट फूडचे सेवन करत असतात. अशा परिस्थितीत त्यांना मूळव्याध, फिशर, फिस्टुला आदी समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

ऐटीत करताय IT त काम ? सांभाळा, आयटीवाल्यांना हा आजार होण्याचा धोका सर्वाधिक
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : सतत बसून राहणे, पोषक, फायबरयुक्त पदार्थ न खाणे, फास्ट फूडचे (fast food) अतिसेवन यामुळे आजकाल अनेक व्याधी लोकांच्या मागे लागत आहेत. एवढेच नव्हे तर अयोग्य खाण्या-पिण्यामुळे तुमचे पचनही बिघडू शकते, ज्यामुळे पोटासंबंधीही(stomach problem) समस्या निर्माण होऊ शकतात. गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता आणि इतर समस्यांचा त्यात समावेश असतो. गॅस आणि बद्धकोष्ठता दीर्घकाळापर्यंत अनेक गंभीर समस्यांचे कारण बनू शकतात, ज्यात मूळव्याधाचा (Piles) देखील समावेश आहे.

मूळव्याध म्हणजे काय ?

दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्टता व गॅसेसची समस्या सुरू असेल तर मूळव्याधाची समस्या निर्माण होते. यामध्ये व्यक्तीला मलत्याग करताना त्रास होऊ शकतो. जे लोक सतत बसून काम करतात, अति तिखट पदार्थ खातात, पुरेसे पाणी पीत नाहीत थोडक्यात ज्यांची फारशी आरोग्यदायी जीवनशैली नसते त्यांना मूळव्याध होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

मूळव्याधाचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे अंतर्गत मूळव्याध व दुसरा हा बाह्य मूळव्याध होय. अंतर्गत मूळव्याधात मलासोबत रक्त येते व बाह्य मूळव्याधात गुदद्वाराभोवती सूज येऊन तीव्र वेदना (pain) होते तसेच खाजही सुटते.

सध्या धूम्रपान आणि तंबाखूचे अतिसेवन, मसालेदार अन्न आणि धकाधकीच्या जीवनामुळे एनोरेक्टल विकार वाढत आहेत. त्यामुळे गुदद्वाराच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. पश्चिमी देशातील वागण्या-बोलण्याची आणि खाण्याचे अनुकरण करण्याचा ट्रेंड आजकाल वाढल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. यामुळे प्रोक्टोलॉजी विकार (गुदाशय आणि गुद्द्वार वाढणे) होत आहे.

आयटी क्षेत्रातील लोकांना होतो जास्त त्रास

आयटी क्षेत्रात काम करणारे तरुण 8 ते 10 तास बसतात आणि भूक लागल्यावर फास्ट फूडचे सेवन करत असतात. अशा परिस्थितीत त्यांना मूळव्याध, फिशर, फिस्टुला आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. असा वेळी दर अर्ध्या तसाचाने कामातून ब्रेक घेऊन थोडी हालचाल करणे, फेऱ्या मारणे फायदेशीर ठरते. तसेच पुरेशा प्रमाणात पाणी पिणे, फळं, फायबरयुक्त पदार्थ खाणेही उपयोगी असते.

मूळव्याध असेल काय टाळावे ?

वारंवार मूळव्याधाचा अथवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तो भविष्यात गंभीर रूप धारण करू शकतो. म्हणूनच योग्य वेळी निदान करून काही गोष्टी करणे तर काही गोष्टी टाळणे महत्वाचे ठरते. फास्ट फूडचे सेवन मूळव्याध वाढवणारे ठरू शकते. फास्ट फूडमध्ये भरपूर मसाले आणि अस्वास्थ्यकर पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे आतड्यांचे खूप नुकसान होते आणि हे पदार्थ आपली पचनसंस्था अन्न नीट पचवू शकत नाही. फास्ट फूड हे मूळव्याध होण्याचे सर्वात मोठे कारण आहे.

तसेच फ्रोजन फूडही आरोग्यास हानिकारक असते. गोठवलेल्या पदार्थांचे सेवन हे पचनासाठी अतिशय हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामध्ये फायबरसारख्या पोषक तत्वांचीही कमतरता असते, ज्यामुळे मूळव्याधची समस्या उद्भवते आणि वाढू लागते. त्याशिवाय तुम्हाला जास्त मसालेदार किंवा तिखट पदार्थ खायला आवडत असतील तर त्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. जास्त तेल आणि मसाल्यांनी बनवलेल्या अन्नामुळे पचनसंस्थेला हानी पोहोचू शकते. आणि त्यामुळे मूळव्याध होऊ शकतो. हे मसालेदार पदार्थ तुमच्या स्टूलमध्ये रक्ताची समस्या देखील वाढवतात.

मूळव्याधाचा त्रास कमी करण्यासाठी काय करावे ?

मूळव्याध हा काही एका दिवसात होणारा आजार नव्हे, त्यामुळे तो बरा होण्यासही काही कालावधी लागू शकतो. त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आहारावर नियंत्रण. संपूर्ण धान्य, फळं-भाज्या यांच्या सेवनाने आरोग्याला केवळ फायदा मिळत नाही तर आजारांपासूनही संरक्षण होते. संपूर्ण धान्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळते जे मूळव्याधात खूप फायदेशीर ठरते . मूळव्याधाचा त्रास असलेल्या रुग्णांनी ओट्स, ब्रराऊन राईस व गहू इत्यादी संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करावा, अशी सूचना डॉक्टर देतात.

तसेच मूळव्याधाची लक्षणे कमी करण्यासाठी फळांचे नियमित सेवन करणे हे खूप फायदेशीर ठरते . केळी, सफरचंद, द्राक्षे, संत्री यांचा आपल्या आहारात समावेश करता येईल. या फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात जी मूळव्याधाचा त्रास दूर करण्यास मदत करतात.

तसेच पुरेसे पाणी पिणेही महत्वाचे ठरते. पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर पाणी हे त्या आजाराच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होत असेल तर दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे, कारण ते शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकते. दिवसभरात किमान 3 -4 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच मलत्याग करणेही सोपे होते.

शेकडो वर्षांपासून होत आहेत शस्त्रक्रिया

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, शेकडो वर्षांपासून पाइल्स आणि फिशरची शस्त्रक्रिया केली जात आहे. यामध्ये रक्तस्त्राव अधिक होऊन रुग्णाला महिनाभर अंथरुणावर राहावे लागत होते. मात्र हळूहळू त्यात प्रगती होत गेली असून आता शस्त्रक्रियेच्या नव्या पद्धती समोर येत आहेत. आजकाल शस्त्रक्रियेनंतर टाके अशा प्रकारे लावले जातात की रक्तस्त्राव थांबतो आणि 48 तासांनंतर रुग्ण कामावर परत येऊ शकतो.