सध्याच्या धावपळीच्या, टेक्नॉलॉजीच्या युगात मोबाईल हा सर्वांची गरज बनला आहे. आणि त्याच मोबाइलला हेडफोन्सची (Headphone) जोड असते. फोनवर बोलण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी तसेच गाणी ऐकण्यासाठी हेडफोनला पसंती देतात. मात्र हेडफोनचा अती वापर आणि त्यावर मोठमोठ्याने गाणी ऐकण्याची सवय यामुळे कानांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. बऱ्याच काळापर्यंत हेडफोन्सवर मोठ्या आवाजात गाणी (Loud Music) ऐकण्याच्या सवयीमुळे ऐकू येण्याची क्षमता कमी (Hearing Loss) होऊ शकते. हेडफोन्स हे कानांसाठी अतिशय घातक असतात व त्यामुळे गंभीर परिणामांना सामोर जावे लागू शकते. फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून हा निष्कर्ष निघाला आहे. यापूर्वीही अनेक रिसर्च आणि अभ्यासातून हेडफोन्समुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती समोर आली होती.
फ्रान्समधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल रिर्सच (INSERM)ने केलेल्या अभ्यासानुसार, फ्रान्समधील लोकांना हेडफोनमुळे बहिरेपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, फ्रान्समध्ये दर चारपैकी एका व्यक्तीला कमी ऐकू येण्याची समस्या भेडसावत आहे आणि याचे मुख्य कारण आहे हेडफोनचा अतिरिक्त वापर. त्याशिवाय बिघडती जीवनशैली, सोशल आयसोलेशन आणि डिप्रेशनही या गोष्टीही त्याला कारणीभूत आहेत. या रिसर्चसाठी 18 ते 75 वयोगटातील 460 लोकांचा , त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला.
ईएनटी स्पेशलिस्ट डॉ. शरद मोहन, यांच्या सांगण्यानुसार हेडफोन किंवा इअरफोनमधून 85dBपेक्षा जास्त आवाजात गाणी ऐकल्यास ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच बऱ्याच कालावधीसाठी मोठा आवाज ऐकणेसुद्धा त्रासदायक ठरू शकते. जे लोक याकडे दुर्लक्ष करतात, ते बहिरेपणाची शिकार होऊ शकतात. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे कानाला इन्फेक्शनही होऊ शकते.
मोठ्या आवाजात गाणी ऐकणे हे फक्त कानांसाठी नव्हे तर हृदयासाठीही धोकादायक ठरू शकते. जेव्हा आपण मोठा आवाज ऐकतो, तेव्हा आपल्या हृदयाचे ठोकेही वाढतात. सतत हेडफोन वापरल्याने ऐकू येण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. बराच वेळ हेडफोन वापरल्याने चक्कर आल्यासारखे वाटणे, झोपेची समस्या, डोकेदुखी तसेच कानदुखीची समस्याही उद्भवू शकते.