डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप…! अवघ्या 4 तासांत चिमुकलीचा हात पुन्हा जोडला , जाणून घ्या कुठे घडली ही घटना

| Updated on: Apr 12, 2023 | 10:35 AM

लखनऊ पीजीआयच्या डॉक्टरांनी एका 10 वर्षांच्या मुलीला नवजीवन दिलं आहे. एका गंभीर अपघातामुळे त्या मुलीला हात कायमचा गमवावा लागला असता, पण सुदैवाने तसं झालं नाही.

डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप...! अवघ्या 4 तासांत चिमुकलीचा हात पुन्हा जोडला , जाणून घ्या कुठे घडली ही घटना
Image Credit source: freepik
Follow us on

लखनऊ : डॉक्टर हे देवाचं दुसरं रुप असतं असं म्हणतात. लखनऊमधील एका घटनेने या वाक्याची सत्यता खरंच पटली आहे. ॲपेक्स ट्रॉमा सेंटर ऑफ पीजीआय, लखनऊ येथील डॉक्टरांच्या (doctors) एका पथकाने 10 वर्षांच्या मुलीला (10 year old) नवजीवन दिलं. त्यांनी या बालिकेचा खांद्यापासून तुटलेला हात (reattach arm) पुन्हा जोडला. अवघ्या 4 तासांत ही शस्त्रक्रिया (operation) करण्यात आल्याने या मुलीला तिचा हात परत मिळाला आणि गंभीर परिस्थिती उद्भवण्यापासून बचावले.

निगोहा येथील रहिवासी असलेल्या या मुलीचा हात ऑइल प्रेस मशीनमध्ये अडकल्याने कापला गेला होता. कुटुंबियांनी ताबडतोब धावाधाव केली आणि ते मुलीला घेऊन पीजीआयच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचले. तेथे डॉक्टरांनी ताबडतोब मुलीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू केली. सुदैवाने आता ती मुलगी आता पूर्णपणे बरी असून हातांच्या नसांना रक्तपुरवठा सुरू झाला आहे. आणखी एक-दोन छोट्या शस्त्रक्रियेनंतर मुलाचे हात पूर्वीसारखे काम करू लागतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पीजीआयमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया झाली आहे.

ही घटना सुमारे 2 महिन्यांपूर्वीची आहे. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता वेदप्रकाश यांच्या मुलीचा उजवा हात मशीनमध्ये अडकल्याने तो कापला गेला. हे पाहून कुटुंबियांनी ताबडतोब धावाधावा केली आणि साडेपाचच्या सुमारासा ते ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचले. तोपर्यंत मुलीच्या हातातून खूप रक्त वाहून गेले होते. प्लास्टिक सर्जरी आणि ॲनेस्थेसिया (भूल देणाऱ्या) डॉक्टरांच्या टीमने त्या मुलीची आणि तिच्या कापल्या गेलेल्या उजव्या हाताची बारकाईने तपासणी केली. यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये आणल्यानंतर प्रथम नीट साफसफाई करण्यात आली आणि कापलेला हात जोडण्याची तयारी सुरू करण्यात आली.

अशी केली यशस्वी शस्त्रक्रिया

ही शस्त्रक्रिया करणारे डॉ. अंकुर भटनागर यांनी सांगितले की, खांद्यापासून कापलेला हात जोडणे, हे मोठे आव्हान होते. अशी घटना घडल्यानंतर सहा तासांच्या आत ऑपरेशन करावे लागते. आम्ही जेव्हा ऑपरेशन सुरू झाले तेव्हा (हात कापला गेल्याची) घटना घडून दोन तास उलटले होते. चार तासांत रुग्णाचा हात जोडणे, हे आमच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान होते. यासाठी आम्ही 25 जणांची टीम तयार केली. त्यादरम्यान, नसा, धमन्या आणि शिरा जोडल्या गेल्या. रक्त खूप वाहून गेले होते, त्यामुळे सहा युनिट रक्त देखील चढवण्यात आले. ऑपरेशननंतर रुग्णाला पहिले दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, त्यानंतर चार दिवस आयसीयूमध्ये देखरेख केल्यानंतर रुग्णाला वॉर्डात हलवण्यात आले.

किडनी निकामी होण्याचाही होता धोका

अशा केसेसमध्ये रुग्णाच्या मृत्यूचा धोका सर्वाधिक असतो कारण स्नायूंमध्ये विषारी पदार्थ जमा होतात, असे डॉ. अंकुर यांनी सांगितले. त्यामुळे अशा परिस्थितीत रक्त वाहून गेल्यावर ते (विषारी पदार्थ) किडनीपर्यंत पोहोचून ती निकामी होऊ शकते, त्यामुळे रुग्णाचा जीव जाऊ शकतो. सहा तासांनंतर विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. त्यामुळे त्यापूर्वीच शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता त्या मुलीमध्ये मज्जातंतू वाढतील, त्यानंतर स्नायूंच्या हस्तांतरणाची शस्त्रक्रिया केली जाईल.  काही काळानंतर सामान्यपणे मुलीचा हात काम करू लागेल.