वॉशिंग्टन : ‘अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है’… हा केवळ शाहरूख खानच्या चित्रपटातील एक डायलॉगच नाहीये तर हे अगदी खरं आहे. एखादी गोष्ट करायचं मनापासून ठरवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी कसून मेहनत घेतली तर काहीच कठीण नाही. अमेरिकेतील निकोलस क्रॉफ्ट (Nicholas Craft) याच्याबाबतीत हे अगदी तंतोतंत खरं ठरतं. 42 वर्षीय निकोलसने कठोर मेहनतीन 10-20 नव्हे तर तब्बल 165 किलो (165 kg weight loss) वजन कमी करू दाखवले. आणि हो यासाठी त्याने कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही की शरीरावर औषधांचा भारंभार माराही केला नाही. त्याने शास्त्रोक्त पद्धतीने चार वर्षांत (4 years) नीट वजन कमी केले. त्याचा हा प्रेरणादायी प्रवास सध्या खूप व्हायरल झाला असून आपणही तो जाणून घेऊया.
सध्या सोशल मीडियावर निकोलसचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. त्याने इतके वजन कमी केले आहे की त्याला ओळखणेही कठीण आहे. अमेरिकेतील मिसिसिपी येथील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय निकोलस क्राफ्टचे वजन जून 2019 मध्ये 294 किलो होते, परंतु 165 किलो वजन कमी केल्यानंतर आता त्याचे वजन 130 किलो झाले आहे. निकोलसच्या पहिल्या आणि आताच्या फोटोमध्ये फरक स्पष्टपणे दिसून येतो. निकोलसने इतके वजन कसे कमी केले हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे
लहानपणापासूनच करावा लागला लठ्ठपणाचा सामना
5 फूट 9 इंच असलेल्या निकोलसने मुलाखतीदरम्यान सांगितले की, “मी लहानपणापासूनच माझ्या जास्त वजनाशी झुंजत आहे. मी शारीरिकदृष्ट्या सक्रिय नव्हतो, त्यामुळेच माझं वजन इतकं वाढले होते. लठ्ठपणामुळे मी कोणत्याही फॅमिली फंक्शनमध्ये जाऊ शकत नव्हतो. सार्वजनिक वाहनाने प्रवास करणंही दूरची गोष्ट होती, त्यामुळे मला फिरताही येत नव्हतं. गुडघेदुखी, अंगदुखी आणि श्वास घेण्यास त्रास अशा अनेक समस्यांचा मी कायम सामना केला होता. ”
डॉक्टरांचा इशारा ठरला निर्णायक
निकोलसने पुढे सांगितले की, “2019 मध्ये एका डॉक्टरने मला सांगितले की जर मी माझ्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर मी केवळ 3 ते 5 वर्ष जगू शकेन. त्यांच्या बोलण्याने माझे डोळे उघडले आणि मला जाणीव झाली की मी लवकरच (वजन कमी करण्यासाठी) काही पावलं उचलली नाहीत तर माझे आयुष्य संपून जाईल. त्यांच्या बोलण्याने मला हेही जाणवलं की मला माझे मार्ग बदलावे लागतील कारण मला जास्त काळ जगायचे आहे.”
आजीने दिला पाठिंबा
डॉक्टरांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे मी खडबडून जागा झालो असे निकोलसने सांगितले. मी वजन कमी करण्याचा दृढ निश्च केला आणि माझ्या आजीनेही यात कमी करण्यात खूप हातभार लावला. ती मला वजन कमी करण्यासाठी प्रेरित करायची पण 2019 मध्ये तिचा मृत्यू झाला. तिला मला सडपातळ पहायचे होते. मी तिला वचन दिले होते की मी वजन कमी करेन. मात्र ते पहायला आजी राहिली नाही. तरीही मी तिला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मेहनत सुरूच ठेवली.
कसा केला वेट लॉस ?
“वजन कमी करण्यासाठी मी काटेकोर डाएटिंग केले नाही, असे निकोलसने नमूद केले. मी फक्त खाण्याच्या पद्धतीत बदल केला आणि कॅलरी मोजायला सुरुवात केली. त्यासोबतच मी सोडा, तळलेले पदार्थ, ब्रेड, पास्ता, जंक फूड खाणे-पिणे बंद केले. कार्बोहायड्रेट आणि त्यांच्या जागी फळे, भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ समाविष्ट केले. तसेच, मी चालण्यावर भर दिला आणि डंबेल्ससह व्यायाम केला. वजन कमी केल्यावर आता माझे शरीर दुखत नाही, श्वासोच्छवासाचा होणारा त्रास नाहीसा झाला. आता मला अधिक उत्साही वाटतं, माझा आत्मविश्वासही वाढला आहे आणि आता माझ्या आकाराचे कपडेही बाजारात उपलब्ध आहेत ” असेही निकोलसने सांगितले.
वजन कमी करण्याचे कोणतेही औषधे किंवा शस्त्रक्रिया केली नाही
“मी वजन कमी करण्यासाठी कोणतेही औषध, शस्त्रक्रिया किंवा इतर पद्धती वापरल्या नाहीत, असे निकोलसने आवर्जून नमूद केले. वजन कमी करण्यासाठी कोणत्याही शॉर्टकटचा अवलंब करू नये, असा सल्लाही त्यांनी लोकांना दिला. नेहमी नैसर्गिकरित्या वजन कमी करा. नैसर्गिक पद्धतीने वजन कमी केल्याने परिणाम दिसण्यास अधिक वेळ लागेल, हे मान्य आहे. पण ते दीर्घकाळासाठी असतील. मी अजून माझे वजन कमी करण्याचे ध्येय गाठले नाही पण मला हे जाणून बरे वाटते की माझ्या प्रवासाने बऱ्याच लोकांना प्रेरणा मिळू शकेल” असेही निकोलसने नमूद केले.