दिवाळीपासून लुटा आरोग्यदायी हवेचा आनंद, महाराष्ट्रासाठी ‘ही’ आनंदाची बाब!

| Updated on: Oct 24, 2022 | 8:42 AM

इथून पुढे राज्यातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. 23 ऑक्टोबर रोजी राज्यात कुठेही पावसाची नोंद नाही, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसळीकर यांनी दिली.

दिवाळीपासून लुटा आरोग्यदायी हवेचा आनंद, महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बाब!
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः दिवाळी (Diwali) आली तरी पावसाळा (Rain) संपत नसल्याचं चित्र पाहून अनेकांना आरोग्याची चिंता सतावत होती. मात्र दिवाळसणानं महाराष्ट्रासाठी (Maharashtra) आनंदाची बातमी आणली आहे. चार ऐवजी पाच महिने मुक्काम ठोकल्यानंतर पावसाचा हंगाम आता संपला आहे. यावेळचा पावसाळा जवळपास 100 दिवस चालला.

20 ऑक्टोबरपासूनच परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती. 23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून मान्सूनने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आरोग्यासाठी सर्वात फलदायी असलेला हिवाळ्याची चाहुल लागली आहे.

दिवाळीतील नरकचतुर्दशी रोजी सकाळी अभ्यंग स्नान करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. पहाटेच उठलेल्या नागरिकांना सकाळची थंडीही जाणवली. दिवाळी पहाटनिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना हिवाळ्याची जाणीव झाली.

इथून पुढे राज्यातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. 23 ऑक्टोबर रोजी राज्यात कुठेही पावसाची नोंद नाही, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसळीकर यांनी दिली.

महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बाब असली तरी देशातील काही भागांवर चक्रिवादळामुळे अलर्ट जारी करण्यात आलाय. रविवारी बंगालच्या खाडीवर सितरंग चक्रिवादळ धडकलं आहे.

बांग्लादेशात या वादळाचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . तेथील तिनकोना बेट आणि सँडविप बरिसल भागात वादळामुळे भुस्खलन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

चक्रीवादळ निरीक्षण विभागाचे प्रभारी आनंद कुमार दास म्हणाले, सितरंग चक्रीवादळ काही तास विक्राळ रुप धारण करेल. त्यानंतर त्याचा प्रभाव कमी कमी होत जाईल.

थायलंडने या वादळाला सितरंग दाव दिलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, या वागळामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होईल. तसेच ओडीशातील उत्तर भागालाही या वादळाचा तडाखा जाणवले.

पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना या वादळाचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. पश्चिम बंगाल हवामान विभागाने सागरी किनारपट्टीवरील नागरिकांना अलर्ट जारी केला आहे.

मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.