अक्षय मंकणी, मुंबईः जगावर पुन्हा एकदा कोरोना (Corona) संसर्गाचं सावट असतानाच देशात आणि महाराष्ट्रात पुन्हा खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खिळखिळ्या झालेल्या आरोग्य यंत्रणेवर (Health system) पुन्हा तीच स्थिती येऊ नये म्हणून प्रशासनातर्फे खबरदारी घेतली जात आहे. मुंबईतील लोकसंख्या पाहता, प्रशासन अलर्ट मोडवर आहे. कोरोनाचा संसर्ग वाढला तर मुंबईकरांच्या शरीरात त्याचा प्रतिकार करण्यासाठी किती प्रमाणात अँटिबॉडीज (Antibodies) तयार झाल्या आहेत, यासंदर्भातील सर्वेक्षणाचा अहवाल लवकरच येणार आहे.
मुंबई महापालिकेने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सिरो सर्वेक्षण केले आहे. येत्या दोन दिवसात याचा अहवाल येणार आहे. त्यानंतर मुंबईकरांच्या शरीरात किती अँटीबॉडीज आहेत, याचा उलगडा होईल.
मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी यासंदर्भात माहिती दिली. सिरो सर्वेक्षणात मिळालेल्या माहितीचे विश्लेषण सुरु असून लवकरच अहवाल सादर केला जाईल, असे त्या म्हणाल्या.
देशातील लसीकरण मोहिमेत मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय प्रमाणात आहे.
लसीकरणानंतर कोरोना विषाणूच्या विरोधात मुंबईकरांमध्ये किती अँटिबॉडीज तयार झाली, हे या सर्वेक्षणातून स्पष्ट होईल. ज्या व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडीज अर्थात प्रतिपिंडे आढळतील, त्यांना कोरोना संसर्गाचा धोका कमी असते.
सिरो सर्वेक्षणात व्यक्तीच्या रक्ताचा नमूना घेऊन त्याची तपासणी केली जाते. लसीकरणानंतर सदर व्यक्तीच्या शरीरात किती अँटिबॉडीज तयार झाल्या, हे तपासले जाते.