मुंबई | 03 फेब्रुवारी 2024 : मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही. एखाद्या दिवशी जेवणात मीठ नसेल तर कितीही चांगलं असणारं अन् बेचव लागतं. पण मीठ योग्य प्रमाणात असेल तर त्याच जेवणाला चव येते. पण याच मिठाचं प्रमाण जास्त झालं. तर मात्र सगळं गणित बिघडतं. जास्त मीठ झाल्यास जेवणाची चव तर बिघडतेच शिवाय त्याचे शरिरावर आणि आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतात. जास्त मीठ खाणं धोक्याचं असतं. त्यामुळे तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात.
मीठामध्ये सोडियम 40 टक्के तर उर्वरित क्लोराईड असतं. हे सोडियम मीठाच्या माध्यमातून शरिरात जातं.सोडियमची शरिराला गरज असते. शरिरातील पेशींमध्ये प्लाझ्मा टिकून राहण्यासाठी, शरिरातील क्षार, पेशींचं कार्य संतुलित ठेवण्याचं काम करतं. मात्र हेच मीठ जर जास्त प्रमाणात खाल्लं तर त्याचे शरिरावर गंभीर परिणाम होतात.
तुम्ही जेव्हा गरजेपेक्षा जास्त मीठ खाता तेव्हा त्याचा तुमच्या शरिरावर गंभीर परिणाम होतो. हृदयरोग, रक्तदाव वाढीच्या समस्या उद्भवतात. याशिवाय लठ्ठपणाचीही समस्या निर्माण होते. मीठ- सोडियमचं अति सेवन हे हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरतं. यामुळे हार्टअॅटॅकचा धोका अधिक असतो.
एका व्यक्तीने पाच ग्रॅम पेक्षा कमी मीठ खायला पाहिजे. 2 ते 3 वर्षांच्या लहान मुलांना कमीच मीठ दिलं गेलं पाहिजे. गर्भवती महिलांना 1,500 मिलिग्रॅम म्हणजे चार ग्रॅमच्या आसपास मीठ खावू शकतात. खासकरून आयोडिन युक्त मीठ खाण्यावर भर दिला पाहिजे.
बाहेरून आणत असलेल्या चमचमीत पदार्थांमध्ये मीठाचं प्रमाण अधिक असतं.चिप्स, कुरकुरे अशा पदार्थांमध्ये मीठाचं प्रमाण अधिक असतं. असे पदार्थ खाणं शक्यतो टाळलं पाहिजे. फ्रोजन किंवा साठवून ठेवलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. या ऐवजी ताजे पदार्थ खाल्ले पाहिजेत. घरी जेवण बनवतानाही मीठाचं प्रमाण कमी करा. कमीत कमी मीठाचं सेवन करा. चिप्स किंवा चमचमीत पदार्थ खाण्याऐवजी फळं, सुकामेवा असे पदार्थ खा… थोडक्यात काय? तर चांगलं खा आणि आरोग्य सांभाळा…