Blood cancer symptom : दरवर्षी देशभरात लाखो लोकांचा कॅन्सर या रोगाने मृत्यू होतो. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्लड कॅन्सर. या कॅन्सरमुळे देखील मृत्यूची संख्या बरीच आहे. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे रक्ताचा कर्करोग (Blood cancer) होतो. त्याला ‘ल्युकेमियाला ब्लड कॅन्सर’ असेही म्हणतात. या आजारात शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वेगाने वाढू लागतात. वेळेवर उपचार न केल्यास हा आजार जीवघेणा ठरतो. ब्लड कॅन्सरचा आजार जनुकीय म्हणजे जेनेटीक (Genetic) नसल्याचे डॉक्टर सांगतात. बदलती जीवनशैली, योग्य व सकस आहार न घेणे, प्रदूषण आणि इतर अनेक कारणांमुळेही कॅन्सरची शक्यता वाढत असते. ब्लड कॅन्सरचा रुग्ण ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’द्वारे (Bone Marrow) बरा होऊ शकतो, फक्त त्याची लक्षणे दिसताच त्वरित तज्ज्ञांकडे जाउन उपचार सुरू करायला हवा.
कॅन्सर तज्ज्ञ डॉ. विनीत कुमार सांगतात, जेव्हा पांढऱ्या रक्त पेशी वाढतात तेव्हा आपला डीएनए बिघडतो. यामुळे रक्ताचा कर्करोग होतो. या कर्करोगाच्या पेशी बोन मॅरोमध्ये वाढतात. त्यामध्ये राहून निरोगी रक्त पेशींची वाढ आणि त्यांच्या कार्यात बाधा निर्माण करण्याचे काम करतात. म्हणूनच ब्लड कॅन्सरला बोन मॅरो कॅन्सर असेही म्हणतात. हे सायटोमेट्री तंत्राद्वारे ओळखले जाते. चाचणीत कॅन्सरची पुष्टी झाल्यानंतर रुग्णाच्या स्टेजनुसार त्यावर उपचार केले जातात.
सुरुवातीच्या टप्प्यात केमोथेरपी आणि रेडिओथेरपी असते. गंभीर प्रकरणांमध्ये, बोन मॅरो बदलले जातात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्णाला सहज वाचवता येऊ शकते, परंतु लोकांना कर्करोगाच्या लक्षणांबद्दल फारशी माहिती नसते. यामुळेच बहुतांश रुग्ण शेवटच्या टप्प्यात पोचल्यावर त्यांना आजाराची माहिती होत असते, परंतु तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो.
वारंवार ताप येणे, शरीराच्या कोणत्याही भागात गाठ होणे, अचानक वजन कमी होणे, अशक्तपणा, रात्री अचानक घाम येणे, सांधे व हाडे दुखणे, सूज येणे अशा समस्या दिसू शकतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, यातील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.