नवी दिल्ली : प्रत्येक पालक हे आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत आणि आहाराबाबत (food and diet) अत्यंत दक्ष असतात. ते अशा गोष्टी मुलांना खायला देतात ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते व वाढही चांगली होते. म्हणूनच सर्वजण मुलांच्या आहारात दुधाचा (milk) आवर्जून समावेश करतात. दूध हा संपूर्ण आहार मानला जातो. त्यामुळे मुलांच्या वाढीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि विकासासाठी दुधाचे सेवन करणे आवश्यक मानले जाते. पण अनेक मुलांना दूध प्यायला आवडत नाही, त्यामुळे पालक दूध चविष्ट बनवण्यासाठी दुधासोबतच असे काही पदार्थ खाऊ घालतात, ज्यामुळे दुधाची चव वाढते. पण हे पदार्थ दुधासोबत मिसळल्याने किंवा त्यांचे दुधासोबत सेवन केल्याने आरोग्य (health) बिघडू शकते.
काही अशी पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे दुधासोबत किंवा दूध प्यायल्यानंतरही (Bad Food Combination With Milk) मुलांना कधीच देऊ नयेत. अन्यथा त्यांना त्रास होऊ शकतो.
दूध आणि आंबट फळं
आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे ती फळं दुधात मिसळल्यास ॲसिड रिफ्लेक्स होतो. यामुळे तुमच्या पोटात भरपूर गॅस तयार होतो, तसेच तुम्हाला डोकेदुखी आणि पोटदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो. म्हणूनच मुलांना दुधासोबत किंवा दूध प्यायल्यानंतर आंबट फळे सेवन करण्यास अजिबात देऊ नयेत.
केळं व दूध / बनाना शेक
उन्हाळ्यात लोकांना बनाना मिल्कशेक प्यायला खूप आवडतं. त्यात बर्फ घालून प्यायलाही छान वाटतं, तर काहीजण जेवतानाही दुधात केळं घालून, त्याची शिकरण करून खातात. पण दूध आणि केळ एकत्र सेवन केल्यास तुमच्या शरीरातील टॉक्सिन्सला चालना मिळते. याच्या वापरामुळे तुमचे मेटाबॉलिज्मही खूप मंदावते. यासोबतच घसादुखीची समस्याही उद्भवू शकते. म्हणूनच बनाना मिल्कशेकचे सेवन टाळणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
दूध व द्राक्षं
जर तुम्ही दुधासोबत किंवा दूध प्यायल्यानंतर द्राक्षं खात असाल तर त्यामुळे पोटात पेटके येणे, जुलाब होणे किंवा उलट्या होणे, असा त्रास होऊ शकतो. म्हणूनच मुलांना हे दूध आणि द्राक्षं एकत्र खायला देणे नेहमीच टाळावे.
दही आणि फळं
दुधाप्रमाणेच दह्यासोबत फळं खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. दही आणि फळं यांचं एकत्र सेवन केल्यास सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत मुलांना सर्दी आणि फ्लूपासून वाचवण्यासाठी फळे आणि दही एकत्र खायला देऊ नयेत.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)