नवी दिल्ली – पास्ता हा जंक फूड (junk food) समजला जातो, जे खाल्याने वजन वाढतं. पास्तामध्ये (pasta) खूप पनीर आणि अनेक तऱ्हेचे प्रक्रिया केलेले मसाले टाकले जातात. त्यामुळे पास्ता चविष्ट लागतो, पण त्यामुळे आपल्या पोटाची चरबीही (belly fat) वाढू शकते. पण जर हाच पास्ता योग्य पद्धतीने शिजवला तर तो वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. ऐकायला हे थोडं विचित्र वाटू शकतं पण हे खरं आहे. पास्ता योग्य पद्धतीने कसा शिजवावा हे जाणून घेऊया.
पास्ता खाणं आहे हेल्दी
पास्ता हा संपूर्ण धान्यापासून तयार केला जातो, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामध्ये भाज्या, फळे किंवा अंडी आणि मासे देखील मिसळले जातात. त्यामुळे पोटाच्या समस्या दूर होऊ शकतात. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊ शकते. एका जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत पास्ता खाणाऱ्या प्रौढ महिलांवर एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असे आढळून आले की पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या भाज्या पास्त्यामध्ये मिसळून खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत झाली.
अभ्यासात काय आढळले ?
145 ग्रॅम पास्ता खाल्ल्यास 7.7 ग्रॅम प्रथिने मिळत असल्याचेही या अभ्यासात समोर आले आहे. हे एक मॅक्रोन्यूट्रिएंट आहे, जे खाल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरल्याची भावना जाणवते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, ग्लूटेन-फ्री पास्तामध्ये थोडी कमी प्रथिने असतात.
पास्ता शिजवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
– संपूर्ण धान्यापासून तयार केलेला पास्ता घ्या. तो पाण्यात नीट शिजवून घ्या व नंतर गाळून घ्या.
– नंतर एक पॅन गरम करा आणि त्यात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब घाला. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मोहरीचे तेलही वापरू शकता.
– त्यात बारीक चिरलेला कांदा, बीन्स, सिमला मिरची, मटार, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घाला. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घाला.
सर्व भाज्या चांगल्या शिजल्यावर त्यात उकडलेला पास्ता घाला. आता टोमॅटो सॉस आणि मेयोनेझ किंवा चीज घालून गॅस बंद करा. थोडा थंड झाल्यावर पास्ता सर्व्ह करा.
जर्नल ऑफ सीरल सायन्स नुसार, पास्ता शिजवून थंड केल्यानंतर खाल्ल्यास तो अधिक हेल्दी ठरतो. पास्ता थंड झाल्यावर काही कार्बोहायड्रेट रेसिस्टेंट स्टार्चमध्ये परावर्तित होतात. स्टार्च पचनास प्रतिरोधक आहे.