मुंबई : पास्ता खायला भरपूर लोकांना आवडतो, पास्ताचं नाव जरी घेतलं तरी बऱ्याच लोकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. यामध्ये मग लहान मुले असो तरुण तरुणी असो किंवा जेष्ठ लोक असो पास्ता खायचं म्हटलं की सगळे आवर्जून तयार असतात. त्यात कुठे बाहेर फिरायला गेल्यानंतर देखील लोक पास्ता अगदी चवीने खातात. पण तुम्हाला माहितीये का की, हाच चविष्ट लागणारा पास्ता तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. होय हे खरं आहे, कारण पास्तामध्ये उच्च कार्ब आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते.
पास्ता हा ड्यूरम नावाच्या गव्हापासून बनवला जातो. तर ड्यूरम हा गव्हाचा बाहेरील थर असतो तो दळून त्याच्यापासून पास्ताचे पीठ तयार केले जाते. तसेच हे तयार पीठ पाण्यात मळून त्याला पास्ताचा आकार दिला जातो. तर काही देशांमध्ये ड्यूरम गहू, अंडी आणि पाणी या तिन्ही गोष्टी मिक्स करून पास्ता तयार केला जातो.
पास्ता खाण्याची एक योग्य पद्धत असते तर तुम्हाला पास्ता खायला आवडत असेल तर आधी तो पास्ता पाण्यात भिजवून ठेवा. कारण पाण्यात भिजवल्यामुळे पास्तामधील असलेला जास्तीत जास्त स्टार्च काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरत नाही. तसेच आपल्या शरीराला एक हेल्दी पर्याय म्हणून तुम्ही पास्ता बनवताना त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकू शकता.
पास्ता खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे अनेक तोटे होतात. कारण पास्तामध्ये फॅट आणि कॅलरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. याचेच आपल्या शरीरात साखरेमध्ये रुपांतर होते, त्यामुळे अनेक आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. पास्तामुळे मधुमेहाची समस्या देखील निर्माण होते.
तसेच पास्ता खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील चरबी वाढते आणि त्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. तसेच उच्च रक्तदाबाची समस्या देखील निर्माण होते. तर ज्या महिलांना पीसीओडीची समस्या आहे अशा महिलांनी पास्ता खाणं टाळावं. कारण पास्ता त्यांच्यासाठी हानिकारक ठरतो.