खराब जीवनशैलीमुळे (Bad Lifestyle) कर्करोगाचे म्हणजेच कॅन्सरचे (Cancer) प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. साधारणत: असे मानले जाते की कॅन्सरचा आजार 60 व्या वर्षानंतर होतो, मात्र आता हा घातक आजार 50 पेक्षा कमी वय असलेल्या लोकांमध्येही होत आहे. असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. लंडनमध्ये ब्रिघम आणि वुमन्स हॉस्पिटलच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. 1990 सालानंतर 50 वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. तरूणांमध्ये (Youth) कोलन, किडनी, लिव्हर आणि स्वादुपिंडाचा कॅन्सर झालेला दिसून येत आहे. लठ्ठपणा, मद्यपान करणे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, या गोष्टी कॅन्सरचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. तसेच अपुऱ्या झोपेमुळेही हा आजार बळावत असून तरूण पिढी त्या आजाराला बळी पडत आहे.
महिला रुग्णालयातील संशोधकांनी हे संशोधन नेचर रिव्ह्यू क्लिनिकल ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित केले आहे. मिंटच्या वृत्तानुसार, गेल्या दशकभरात लोकांच्या जीवनशैलीत, दिनचर्येत खूप बदल झाला आहे. लोकांच्या झोपेचा पॅटर्न बदलला आहे, लठ्ठपणा वाढत आहे आणि लोकं पोषण व योग्य आहार घेण्याकडेही नीट लक्ष देत नाही, असे संशोधकांना आढळले आहे.
संशोधनात म्हटले आहे की, 1950 च्या दशकापासून मधुमेह, लठ्ठपणा, जीवनशैली सक्रिय नसल्याने आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्यामुळे शरीरात कॅन्सर होत आहे. खराब जीवनशैली, वेळेवर न झोपणे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी या गोष्टी तरुणांमध्ये अधिक दिसून येत असून, त्यामुळे त्यांना कॅन्सर होत आहे. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये तरुणांमधील कॅन्सरची लक्षणे लवकर ओळखून उपचार सुरू केले जातात, त्यामुळे मृत्यूची प्रकरणे नियंत्रणात राहतात.
महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे रुग्णही लक्षणीयरीत्या वाढल्याचे या संशोधनातून दिसून आले आहे. एकूण १४ प्रकारच्या कॅन्सरमध्ये वाढ झाली आहे. कॅन्सरचे वेगळे कारण नसल्याचेही या संशोधनात आढळले आहे. इतर आजारांप्रमाणेच खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायाम न करणे आणि खराब जीवनशैली यामुळे हा आजार होत आहे.