मुंबई : जेव्हा शरीरातील पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि शरीराच्या इतर भागात पसरतात तेव्हा कर्करोग होतो. या पेशी ट्यूमर बनवू शकतात किंवा जवळच्या ऊती आणि अवयवांवर आक्रमण करू शकतात, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. या कर्करोगाच्या पेशी वेगाने विभाजित होऊ शकतात आणि शरीराच्या सामान्य कार्यात व्यत्यय आणू शकतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला त्यांचा सामना करणे कठीण होते. याबाबत डॉ.अमोल पवार, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट यांनी सविस्तर सांगितलं आहे.
कर्करोगाच्या काही सामान्य प्रकारांमध्ये स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग आणि कोलोरेक्टल कर्करोग यांचा समावेश आहे. स्तनाचा कर्करोग हा भारतातील आणि जगभरातील सर्वात प्रचलित कर्करोगांपैकी एक आहे, जो स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही प्रभावित करतो.
देशात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. हे रुग्णांमध्ये उच्च विकृती आणि मृत्यू दरास कारणीभूत ठरते. ज्या लोकांना कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांनी कर्करोगापासून बचाव करण्यासाठी काही उपायांचे पालन करून स्वतःची काळजी घेतली पाहिजे.कर्करोग टाळण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी खालील टिप्सचे पालन करा.
संतुलित आहाराची निवड करणे कर्करोगापासून बचाव करण्याचा एक प्रभावी मार्ग ठरतो. संशोधनानुसार, फळे, भाज्या आणि धान्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात जे कर्करोगास कारणीभूत घटकांपासून संरक्षण करतात. हे पदार्थ केवळ एकंदर आरोग्यालाच नाही तर कर्करोगाविरूद्ध शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला बळ देतात. शिवाय, कर्करोगाशी संबंधित असलेल्या लठ्ठपणाला प्रतिबंध करण्यासाठी एखाद्याने वजन नियंत्रित राखले पाहिजे.
नियमित शारीरिक हालचालींना प्राधान्य दिल्याने विशिष्ट प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते. व्यायामामुळे केवळ वजन नियंत्रणात राखण्यात मदत होत नाही, तर त्याचा थेट परिणाम हार्मोन्सच्या पातळीवर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होतो, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी पर्यावरणातील कारणीभूत घटकांबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. तंबाखूचा धूर, वायू प्रदूषण, कीटकनाशके आणि उत्पादनांमधील रासायनिक पदार्थ यासारख्या हानिकारक पदार्थांचा संपर्क कमी केल्याने आरोग्यात सुधारणा येऊ शकते.
धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने फुफ्फुसाचा आणि तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. या उत्पादनांचा वापर टाळणे योग्य राहिल. अल्कोहोलच्या गैरवापरामुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो, म्हणून अल्कोहोलचा वापर टाळा.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फुफ्फुस, स्तन, ग्रीवा, मौखिक, कोलन आणि प्रोस्टेट कर्करोगाची नियमित तपासणी करा. कोणत्याही कर्करोगाचा धोका निश्चित करण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करा आणि तुमच्या आरोग्याची स्थिती जाणून घ्या. तुमच्या जीवनशैलीत हे सोपे बदल करून, तुम्ही कर्करोगापासून बचाव करु शकता आणि तुमच्या दीर्घकालीन आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी सक्रिय पावले उचला.