नवी दिल्ली – फुफ्फुसं (lungs) हे आपल्या छातीतील असे दोन अवयव आहेत, जी आपण श्वास घेतल्यावर ऑक्सिजन आत घेतात. आणि श्वास सोडल्यावर कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात. अनेक वेळा फुफ्फुसामध्ये कॅन्सरसारखा (lung cancer) घातक आजार होतो. फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, तो पसरत नाही तोपर्यंत या आजाराची लक्षणे दिसत नाहीत. पण काही केसेसमध्ये त्याची लक्षणे (symptoms) अगदी सुरुवातीला दिसून येतात. ही लक्षणे लक्षात आल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांकडे गेल्यास त्याचे प्राथमिक अवस्थेत निदान होऊ शकते आणि त्यावर उपचार करणेही शक्य असते. सतत येणारा खोकला हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. त्याच्या इतर 5 लक्षणांबद्दल जाणून घ्या.
काय आहेत फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणे ?
धुम्रपान हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण मानले जाते. मात्र, धूम्रपान न करणाऱ्या लोकांनाही हा कॅन्सर होऊ शकतो. फुफ्फुसाच्या कॅन्सरचे नेमके कारणे माहित नाहीत. सतत येणाऱ्या खोकल्याशिवाय, त्याची काही इतर लक्षणेही आहेत, ती खालीलप्रमाणे :
श्वास घेण्यास त्रास होणे – जर तुम्हाला सतत खोकला येत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. मात्र, हे इतर काही समस्यांचे लक्षण देखील असू शकते. म्हणूनच त्याचे योग्य निदान करण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधून आवश्यक त्या चाचण्या करून घ्याव्यात.
वजन कमी होणे – तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत नसाल, तरीही जर तुमचे वजन कमी होत असेल तर हेही फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
हाडांमध्ये वेदना होणे – हाडांमध्ये खूप वेदना होणे आणि अत्याधिक थकवा येणे हेही फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
सूज – आपला चेहरा, मान आणि छातीच्य वरच्या भागात सूज येणे हेही फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत जराही वेळ न घालवता त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी किंवा डॉक्टरांशी संपर्क साधावा. वेळेवर निदान झाल्यास या कॅन्सरवर उपचार करणे शक्य आहे.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)