नवी दिल्ली : सतत काम केल्यानंतर शरीराला विश्रांतीचीही (taking rest) गरज असते. शरीरासाठी पाणी पिण्याइतकेच विश्रांती घेणे देखील महत्त्वाचे आहे. पण जर हा आराम तुम्हाला रोगांकडे (diseases) ढकलत असेल तर ? असाच दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. इंग्रजी न्यूज वेबसाईट डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, विश्रांती घेणे देखील आता अस्वास्थ्यकर सवयींमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. अर्थात हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हार्वर्डच्या संशोधनातून असं समोर आलं आहे की, जास्त वेळे विश्रांती घेणेही आपल्या शरीरासाठी घातक (side effects of more rest) आहे.
हार्वर्डच्या संशोधनानुसार, जे लोक दुपारी जास्त वेळ झोपतात किंवा विश्रांती घेतात त्यांचे वजन वाढण्यासोबत उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका जास्त असतो. तज्ज्ञांच्या मते, दररोज 30 मिनिटांच्या डुलकीचाही तुमच्या हृदयाच्या ठोक्यावर परिणाम होतो.
स्पेनमध्ये झाले संशोधन
संशोधकांनी स्पेनमधील मर्सिया येथील 3,275 लोकांचा टेडा गोळा करून त्याचा अभ्यास केला. हे लोकं कधी झोपतात, त्यांची जीवनशैली कशी आहे, तसेच इतर फॅक्टर्सबाबतीतही माहिती गोळा करण्यात आली. आराम न करणे, 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ आराम करणे आणि 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आराम करणे अशा कॅटॅगरीज तयार केल्या. त्यामध्ये त्यांना आढळले की जे लोक जास्त वेळ झोपतात किंवा विश्रांती घेतात त्यांचा बॉडी मास इंडेक्स जास्त असतो. या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारखे मेटाबॉलिक सिंड्रोम असण्याची शक्यता होती. त्यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही होता.
पॉवर नॅप घेण्यात कोणताही धोका नाही
संशोधनानुसार, ‘पॉवर नॅप’ घेतलेल्या लोकांमध्ये जोखीम वाढण्याची कोणतीही चिन्हे दिसून आली नाहीत. संशोधकांना असे आढळून आले की, रात्रीचे जेवण आणि झोपण्याच्या वेळेव्यतिरिक्त जास्त काळ झोप किंवा विश्रांतीचा कालावधी, जास्त कॅलरी घेणे आणि धुम्रपान करण्याशी संबंधित आहे. संशोधकांच्या मते, उशिरा जेवण्याची, झोपण्याची किंवा धूम्रपान करण्याची सवय असलेल्या लोकांसाठी अल्पकालीन विश्रांती दीर्घकाळासाठी फायदेशीर आहे का, यासंदर्भात अधिक संशोधनाची गरज आहे.