नवी दिल्ली : आपण बऱ्याच वेळेस एखाद्या दुकानातून विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर (reuse) करतो. महिनोमहिने ती बाटली आपण पाणी पिण्यासाठी (water bottle) वापरत असतो. वेळोवेळी ती स्वच्छ धुवून त्याचा वापर सुरू असतो. पण हीच रीयुजेबल(reusable) बाटली आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. कसं ते माहीत आहे ? एका अभ्यासातून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, पुनर्वापर करता येणाऱ्या पाण्याच्या बाटलीवर लाखो बॅक्टेरिया (bacteria) असू शकतात.
पुन्हा वापरता येण्याजोग्या बाटल्यांमध्ये सरासरी टॉयलेट सीटपेक्षा सुमारे 40,000 पट जास्त बॅक्टेरिया असू शकतात, असे एका नवीन अभ्यासात आढळून आले आहे. अमेरिकेतील वॉटरफिल्टर गुरू या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामध्ये हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. त्यांच्या संशोधकांच्या पथकाने पाण्याच्या बाटल्यांचे वेगवेगळ्या भागांचे परीक्षण केले असता त्यामध्ये त्यांना दोन प्रकारचे बॅक्टेरिया आढळले.
यामुळे रियुजेबल बाटल्यांच्या वापराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या अभ्यासात, संशोधकांनी असे स्पष्ट केले की ग्रॅम-निगेटीव्ह बॅक्टेरियामुळे संसर्ग होऊ शकतो जे प्रतिजैविकांना वाढत्या प्रमाणात प्रतिरोधक असतात, त्यामुळे काही प्रकारच्या बॅसिलस गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात. त्यांनी बाटल्यांच्या स्वच्छतेची तुलना घरातील वस्तूंशी केली असता, बाटल्यांवर स्वयंपाकघरातील सिंकपेक्षा दुप्पट, कॉम्प्युटर माऊसच्या चौपट आणि पाळीव प्राण्यांच्या पाणी पिण्याच्या भांड्यापेक्षा 14 पट जास्त जीवाणू असतात, असे आढळल्याचे नमूद केले.
इंपीरिअल कॉलेज ऑफ लंडन येथील शास्त्रज्ज्ञ डॉ. अँड्र्यू एडवर्ड्स यांच्या सांगण्यानुसार, या बाटलीमुळे माणसाचं तोंड बॅक्टेरियाचं सर्वात मोठं घर बनले आहे. ही पाण्याची बाटली बॅक्टेरियासाठी एक प्रजननाची जागा बनली असून ते खूप वेगाने वाढत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान पाण्याच्या बाटल्यांवर मोठ्या संख्येने बॅक्टेरिया आढळत असले तरी ते (बॅक्टेरिया) धोकादायक असतीलच असे नाही, असे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.
पाण्याच्या बाटल्यांवर आढळणाऱ्या विषाणूंच्या पार्श्वभूमीवर या बाटल्या दररोज गरम पाणी व साबणाने धुवाव्यात, तसेच आठवड्यातून एकदा सॅनिटाईज केल्यानंतरच वापराव्यात असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.