मुंबई, बदललेली जीवनशैली, वातावरणातले बदल आणि वाढत्या प्रदूषणामुळे दमा (Asthma) हा एक सामान्य आजार झाला आहे. श्वसन मार्गात निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे दमा होतो (Signs Of Asthma). दम्याच्या वेळी, श्वास घेणे कठीण होते, त्यामुळे कोणतेही काम करणे आव्हानात्मक होते. अस्थमा हा कोणत्याही वयोगटातील पुरुष, स्त्रिया आणि मुलांना होऊ शकतो, परंतु 13 वर्षांखालील मुलांमध्ये तो जास्त प्रमाणात दिसून येतो. या आजारात खोकला आणि छातीत जड होण्याची समस्या उद्भवते. कधी कधी दम्याचा त्रास वाढल्यावर इनहेलर (Inhaler) पंपाचाही आधार घ्यावा लागतो. प्रत्येक व्यक्तीनुसार या आजाराची वेगवेगळी लक्षणे दिसू शकतात. काहींना श्वास घेण्यास त्रास होतो तर काहींना छातीत जडपणा जाणवतो.
बऱ्याचदा व्यक्तीच्या शरीरात योग्य ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दम्याचा अटॅकदेखील येतो, त्यामुळे ओठ निळसर दिसू शकतात. दम्याचा अटॅक येण्याची चिन्हे ओळखणे खूप सोपे आहे.त्याचे संकेत ओळखल्यास अटॅक रोखला जाऊ शकतो.
दम्यापासून बचावासाठी रसायने आणि सुगंध जास्त असेल अशा ठिकाणी जाण्याचे टाळणे आवश्यक आहे. केमिकल किंवा जास्त सुगंधामुळे दम्याचा त्रास उदभवू शकतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
दमा हा एक प्रकारचा ऍलर्जीजन्य आजार आहे जो धूळ, माती किंवा बारीक कणांमुळे होऊ शकतो. ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी धूळ आणि धुरापासून दूर राहावे. अनेकांना परफ्यूम आणि सुगंधांचीही ॲलर्जी असते. याशिवाय धूम्रपान सोडणे आणि ध्रुम्रपान करणाऱ्याच्या संपर्कात येणे बंद करावे. दम्याचा अटॅक टाळण्यासाठी मास्कचा वापर केला जाऊ शकतो.