असे म्हणतात की निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्याचप्रमाणे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारासोबतच 7 ते 8 तासांची पूर्ण झोप देखील आवश्यक आहे. जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल किंवा अति झोप येत असेल, तर ही समस्या म्हणजे झोपेचा विकार मानली जाते. झोपेचा विकार (Sleep Disorder) एखाद्या व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे हानी पोहोचवण्यासाठी पुरेसा आहे. कोरोनंतर (Post Corona) अनेकांना झोपेची समस्या जाणवत असल्याचे समोर आले आहे. नीट झोप न लागल्यामुळे किंवा अति झोप लागत असल्याने थकवा, डोकेदुखी आणि अशक्तपणाची समस्या उद्भवते. न्यूरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या मते, स्लीप रिलेटेड डिसऑर्डर (SRD) सारख्या आजारांमागे माहितीचा अभाव असल्याचे सांगितल्या गेले आहे.
झोप न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की तणाव, चिंता आणि नैराश्य. यापैकी कोणत्याही एका समस्येमुळे झोप येत नाही, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या शरीरावर आणि मनावर होतो. कधीकधी ही समस्या इतकी गंभीर होते की झोपेत बोलणे, अधिक स्वप्ने पाहणे आणि झोपेत चालणे देखील सुरू होते. याशिवाय काहींना गरजेपेक्षा जास्त झोप येणे, उत्साह न वाटणे, लहान लहान कामाने थकवा जाणवणे अशा समस्या पाहायला मिळतात.