नवी दिल्ली : आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी झोप (sleep) खूप महत्त्वाची आहे. रात्री पुरेशी झोप घेतली नाही तर शरीर अनेक आजारांचे घर बनते. याआधीच्या अनेक संशोधनांमध्ये असे म्हटले आहे की रात्री पुरेशी झोप न (less sleep) घेतल्याने तणाव आणि हृदयरोगाचा (risk of heart disease) धोका वाढतो. आता एका नव्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, रात्री 5 तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या बंद होतात. इतकंच नव्हे तर यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो.
मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या या अभ्यासात असे म्हटले आहे की 5 तासांपेक्षा कमी झोपेमुळे पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) चा धोका 74 टक्क्यांनी वाढतो. PAD ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह कमी होतो. रक्तवाहिन्यांद्वारे रक्त मेंदूपासून पायांपर्यंत पोहोचवले जाते.
अभ्यासानुसार, कमी झोपेमुळे संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार होऊ शकतात.
सात तासांची झोप पीएडीची जोखीम कमी करू शकते
ग्लोबल डायबिटीज कम्युनिटीच्या वेबसाइटनुसार, अभ्यासात असे म्हटले आहे की याचे पहिले कारण म्हणजे फॅटी प्लेक, म्हणजे चरबीपासून बनलेली चिकट घाण धमन्यांमध्ये जमा होऊ लागते. याला वैद्यकीय भाषेत ॲथेरोस्क्लेरोसिस (atherosclerosis) असे म्हणतात. संशोधकांनी सांगितले की, कमी झोपेमुळे होणाऱ्या कोरोनरी आर्टरी डिसीजबद्दल आम्हाला आधीच माहिती होती, पण झोपेच्या कमतरतेमुळे पीएडीच्या आजाराबाबत पहिल्यांदाच माहिती मिळाली आहे.
स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या प्रमुख संशोधकांनी सांगितले की, आमच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की दररोज सात ते आठ तासांची झोप ही पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका बर्याच प्रमाणात कमी करते. संशोधनात असे आढळून आले आहे की रात्रीची कमी झोप एकतर PAD चा धोका वाढवते किंवा PAD मुळे झोप कमी होते. या अभ्यासात असे म्हटले आहे की जगातील सुमारे 20 कोटी लोक PAD आजाराने ग्रस्त आहेत.
लाइफस्टाइलमध्ये बदल गरजेचा
या अभ्यासात 6.50 लाख लोकांचा समावेश होता आणि त्यांना दोन भागांत विभागण्यात आले होते. पहिल्या भागात, संशोधकांनी अभ्यासातील सहभागींमध्ये दिवसाच्या झोपेचे प्रमाण आणि रात्रीच्या झोपेची एकूण वेळ लक्षात घेतली. त्याच वेळी, कोणत्या लोकांना PAD चा धोका होता, हे देखील लक्षात आले. दुस-या भागात जेनेटिक डेटाद्वारे या आजाराची लिंक शोधण्यात आली.
कमी झोपेमुळे पीएडीचा धोका अनेक पटींनी वाढतो याचा भक्कम पुरावा अभ्यासात आढळून आला. मात्र या विषयावर अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे. यामध्ये, कमी झोपेमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक कसे जमा होऊ लागतात हे शोधणे आवश्यक आहे. जीवनशैलीत बदल करून झोप वाढवता येते. विशेषतः शारीरिक हालचालींद्वारे, PAD चा धोका देखील कमी केला जाऊ शकतो, असे संशोधकांनी सांगितले.