आधुनिक काळात सर्वच वयोगटांमध्ये स्मार्टफोन्सचा (Smartphones) वापर वेगाने वाढला आहे. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण स्मार्टफोन्सच्या या मायाजाळात अडकलेला दिसून येत आहे. कोरोना काळात ज्या वेळी सर्वच जण घरात होते त्या वेळी मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन्सचा वापर (Use) वाढला. खासकरुन लहान मुलांना स्मार्टफोनची जास्त ओढ लागल्याचे दिसून आले. पूर्वीच्या काळी केवळ संदेश वहनाचे काम करणारा फोन ‘स्मार्ट’झाल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. परंतु याचा अतिरेकी वापर केल्यास केवळ डोळ्यांवरच नाही तर शरीराच्या अनेक अवयवांवर (organs) याचा नकारात्मक परिणाम पडत असतो. स्मार्टफोन्समुळे केवळ एक दोन नव्हे तर अनेक आजारांचा धोका वाढत आहे. webmd.com या वेबसाइटने स्मार्टफोनच्या अतिवापराने शरीरावर होत असलेल्या दुष्परिणामांची माहिती दिली आहे.
1) मानेचे आजार : बराच वेळ स्मार्टफोनमध्ये गुंतलेले राहिल्यास टेक्स्ट नेक सिंड्रोम होण्याचा धोका असतो. यात तुमची मानेच्या मसल्समध्ये स्ट्रेन आणि टाइटनेस येण्याची शक्यता असते. या शिवाय नर्व पेनसारख्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. बराच वेळ मोबाईल चाळत राहिल्याने खांद्यापासून ते हातापर्यंत दुखणे लागू शकते. webmd नुसार 20 मिनिटांनंतर स्ट्रेचिंगचा व्यायाम केला पाहिजे.
2) बोटांची समस्या : वारंवार मोबाईल चाळत राहिल्याने अंगठ्याच्या मेकेनिजममध्येही वाईट परिणाम होत असतो. हातात स्मार्टफोन पकडण्याच्या सवयीचाही परिणाम एकंदर हाताच्या दुखण्यावर होत असतो. यामुळे अंगठ्याचे दुखणे लागू शकते. त्यामुळे केवळ गरजेपुरताच स्मार्टफोन्सचा वापर करावा.
3) डोळ्यांवर परिणाम : स्मार्टफोन्समुळे सर्वात जास्त डोळ्यांचे नुकसान होत असते. वारंवार स्मार्टफोन्सचा वापर केल्याने डोळ्यांचे नुकसान होते. याचा परिणाम झोपेवरही होउ शकतो. पुरेशी झोप नसल्याने लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब अशा समस्या निर्माण होत असतात. स्मार्टफोन्समधून निघणारे ब्लू रेज् डोळ्यांचे नुकसान करीत असतात. अंधारात स्मार्टफोन वापराणे डोळ्यांचे अधिक नुकसान होत असते.
4) कान व खांद्यावर परिणाम : वारंवार मोबाईलवर बोलल्यामुळे कान तसेच खांद्यावर वाईट परिणाम होत असतो. तासंतास मोबाईलवर बोलल्यास कानाच्या श्रवण शक्तीवर परिणाम होत असतो. शिवाय खांद्याचे दुखणे लागू शकते.
खांद्याचे हे दुखणे बराच वेळेपर्यंत राहू शकते, त्यामुळे मोबाईलचा कमीत कमी वापर करावा.