नवी दिल्ली : धुम्रपानामुळे आरोग्याला खूप नुकसान होते हे बहुतेकांना माहीत आहे. त्याच्या दुष्परिणामांचीही सर्वांना पुरेशी कल्पना असतेच. धूम्रपान (smoking) केल्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगासह (cancer) अनेक आजार होण्याचा धोका आहे. तसेच श्वसनाचे आजार, हृदयविकार आणि ब्लड प्रेशरचाही त्रास होतो. अनेक लोक तणाव कमी करण्यासाठी धूम्रपान देखील करतात. यामुळे शरीराला बरं वाटतं असं त्यांना वाटतं, पण ते चुकीचं आहे. अशा परिस्थितीत धूम्रपान करणे हे अनेक वेळा व्यसन बनते, परंतु धू्म्रपान केल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य (mental health) बिघडू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ?
जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) अहवालानुसार, धूम्रपान केल्यामुळे दररोज 14 लोकांचा जीव जातो. मात्र सिगारेट ओढणारेच नव्हे तर आजूबाजूला उभ्या असलेल्या किंवा वावरणाऱ्या लोकांनाही त्रास होतो. याला पॅसिव्ह स्मोकिंग (Passive Smoking) म्हणतात. धूम्रपानाचा केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावर नव्हे तर मानसिक आरोग्यावरही परिणा होतो, तो कोणता हे जाणून घेऊया.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती धूम्रपान करते तेव्हा अनेक प्रकारचे धोकादायक कण फुफ्फुसातून शरीरात प्रवेश करतात. ते शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण वाढवण्याचे काम करतात. तणाव वाढल्यामुळे चिंता देखील उद्भवते आणि यामुळे अनेक प्रकरणांमध्ये नैराश्य येऊ शकते. जे लोक जास्त धूम्रपान करतात त्यांना अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांचा धोका असतो. शरीरातील 20 हून अधिक रोगांसाठी ते जबाबदार आहे. धूम्रपानामुळे आरोग्याचे शारीरिक आणि मानसिकरित्या मोठे नुकसान होते.
मेंदूच्या कार्यावरही पडतो प्रभाव
धूम्रपानामुळे मेंदूतील काही रसायनांमध्ये गडबड होण्याचा धोका असतो. याच कारणामुळे, जेव्हा लोक धूम्रपान सोडतात तेव्हा त्यांची चिडचिड होते आणि ते हे व्यसन सहजपणे सोडू शकत नाहीत. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की चेन स्मोकर्समध्ये चिंतेची समस्या उद्भवते. काही प्रकरणांमध्ये, हे लोक नैराश्याचे बळी देखील असू शकतात. अशा परिस्थितीत धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हळू-हळू कमी करावे स्मोकिंग
डॉक्टर सांगतात की, धूम्रपान शरीरासाठी सर्व प्रकारे हानिकारकच आहे. अशा परिस्थितीत, ते सोडणे चांगले. धूम्रपान हळूहळू सोडले जाऊ शकते. धूम्रपान केल्याने मूड सुधारतो किंवा तणाव कमी होतो असे ज्या लोकांना वाटते ते चुकीचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात या संदर्भात असे कोणतेही संशोधन झालेले नाही. धूम्रपान केल्याने तुम्हाला काही काळ बरे वाटते, पण त्यामुळे तणाव कमी होत नाही. याचा मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो, ज्यामुळे मानसिक आरोग्याचे विकार होण्याचा धोका लक्षणीय वाढतो.