नवी दिल्ली – आपण कसे राहतो, काय खातो, कधी झोपतो, या गोष्टी जरी शुल्लक वाटत असल्या तरी त्यांचा आपल्या शरीरावर हळूहळू परिणाम होत असतो. खराब जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. किडनी स्टोनही (kidney stone) याच आजारांपैकी (health disease) एक आहे. काही काळापासून अनेक लोकांना किडनी स्टोन होण्याची समस्या सतत वाढत आहे. किडनी हा आपल्या शरीरातील अतिशय महत्वपूर्ण अवयव आहे. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे पदार्थ किडनीद्वारे टाकले जाते. मात्र खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. या आजाराला वैद्यकीय भाषेत नेफ्रोलिथियासिस (Nephrolithiasis) किंवा युरोलिथियासिस (Urolithiasis) असे म्हणतात. वेळीच हा आजार ओळखून त्यावर उपचार केल्यास फायदा होतो.
किडनी स्टोन तयार झाल्यावर वेदना आणि गोंधळाची पातळी वाढते. जेव्हा कॅल्शिअम, ऑक्सलेट आणि यूरिक ॲसिड यांसारखे काही पदार्थ मूत्रात मिसळतात तेव्हा ते तयार होतात आणि क्रिस्टल्स तयार होतात. हे स्फटिक एकत्र येऊन दगड अथवा स्टोन बनतो. किडनी स्टोन मोठ्या ते लहान आकारात असू शकतात.
शरीरामध्ये जेव्हा किडनी स्टोन अथवा मुतखडा होतो, तेव्हा मूत्राशयातील (Bladder) मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो आणि परिणामी संबंधित व्यक्तीला लघवी करण्यास जळजळ होणे, आग होणे, प्रचंड प्रमाणात वेदना होणे, मळमळ आणि उलट्या यांसारखी लक्षणे जाणवू लागतात. तसेच पाठीच्या बाजूला, कंबरेच्या बाजूला आणि पोटाच्या खालच्या (ओटीपोटात) भागातही त्रास होऊ लागतो. ही अतिशय वेदनादायी अवस्था असते.
सोप्या भाषेत सांगायचे तर, किडनी स्टोनचा थेट परिणाम आपल्या मूत्रमार्गावर होतो. शरीरामध्ये किडनी स्टोन निर्माण होण्याची कारणे वेगवेगळी असतातयामागे अनुवांशिकता, आहार आणि कमी पाणी पिणे तसेच आपल्या शरीरामध्ये खनिजे आणि क्षार पदार्थ यांची मात्रा वाढणे, यासह अनेक कारणे असू शकतात.
आहारकडे द्या लक्ष
किडनी स्टोन झाल्यास आहारकडे विशेष लक्ष द्यावे लागते. याबपासून बचाव करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे हेल्दी डाएट फॉलो करणे. तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर तुम्हाला विशेष आहार घ्याव, जेणेकरून स्टोन्सची संख्या वाढणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही पदार्थ अतीप्रमाणात खाऊ नका आणि संतुलित आहार घ्या.
किडनी स्टोनचा त्रास असेल तर काय खावे ?
– शरीराला हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे, त्यामुळे पाण्यासोबत इतर द्रवपदार्थ घ्या. दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. जर तुम्ही उष्ण वातावरणात राहत असाल आणि जास्त सक्रिय असाल तर जास्त पाणी प्या.
– तसेच कॅल्शिअमचे चांगल्या प्रमाणात सेवन करा. यासाठी दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. कमी कॅल्शिअम घेतल्यास लघवीत ऑक्सलेटचे प्रमाण वाढते.
– मीठ आणि मांसाचे सेवन नियंत्रित करा. यासाठी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि लीन प्रोटीन यांचा आहार घ्या.
काय खाऊ नये ?
मांसाहारासह मिठाई आणि कॅफेनचे सेवन कमी करा. मांसाहार, जसे की लाल मांस, यामुळे लघवीमध्ये यूरिक ॲसिडची पातळी वाढवते, ज्यामुळे किडनी स्टोन तयार होऊ शकतात. मिठाई आणि कॅफीन मूत्रात कॅल्शियमचे प्रमाण वाढवतात, ज्यामुळे मूत्रपिंडात कॅल्शिअमचे खडे तयार होतात. अल्कोहोलचे सेवन देखील नियंत्रणात असले पाहिजे, कारण यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, ज्यामुळे किडनी स्टोन तयार होतात.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)