रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपले अनेक दुखण्यांकडे, व्याधींकडे दुर्लक्ष होत असते. मात्र भविष्यात त्याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याकडे योग्य लक्ष देऊन वेळच्यावेळी योग्य उपाययोजना करणे गरजेचे असते. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण एखादी गोष्ट, काम करायला विसरतो, थोड्या वेळाने ते पुन्हा आठवले की ते काम पूर्ण करतो. मात्र विसरण्याची ही क्रिया वारंवार होत असेल, तर आपण वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण हाच विसरभोळेपणा पुढे जाऊन वाढू शकतो. आजच्या जीवनात ‘अल्झायमर’चा (Alzheimer) धोका वाढत आहे. डिमेंशिया सिंड्रोमचा सर्वात कॉमन फॉर्म असणारा ‘अल्झायमर’ हा आजार पूर्णपणे बरा करणारा कोणताही उपाय अथवा थेरपी अद्याप विकसित झालेली नाही. अल्झायमर हा मेंदूशी (Brain) संबंधित आजार असून सोप्या भाषेत त्याला स्मृतिभ्रंश किंवा विसरभोळेपणा म्हणता येऊ शकेल. या आजारात व्यक्तीच्या स्मृतीवर (Memory)परिणाम होऊ शकतो.
अल्झायमर वाढण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या ‘ताऊ’ (Tau)या प्रोटीनबद्दल फ्लिंडर युनिव्हर्सिटीतील अभ्यासातून नवी माहिती समोर आली आहे. त्याद्वारे या रोगाच्या उपचारासाठी मदत होऊ शकेल. सायन्स ॲडव्हान्सेस जर्नलमध्येही ही माहिती छापून आली आहे. ताऊ प्रोटीनमध्ये आजाराशी संबंधित बदल कसा होतो, हे या अभ्यासातून समोर आले असून, त्यानंतर ताऊ प्रोटीन निरोगी अवस्थेत ठेऊन त्याचा मेंदूच्या पेशींवर होणारा परिणाम रोखण्यासाठी नवा मार्ग मिळेल अशी आशा आहे. ” अमीलॉइड बीटा या पेप्टाइडव्यतिरिक्त ताऊ प्रोटीन हे अल्झायमर आजारातील एक मुख्य घटक आहे. ताऊमुळे मेंदूतील पेशींवर विषारी परिणाम होतो, ज्यामुळे स्मरणशक्तीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो, ” असे फ्लिंडर्स हेल्थ ॲंड मेडिकल रिसर्च न्युरोसायन्सचे वरिष्ठ संशोधक डॉ. अर्ने इटनर यांनी सांगितले.
हा मेंदूशी संबंधित आजार आहे. यामध्ये रुग्णाच्या स्मरणशक्तीवर हळूहळू परिणाम होतो. त्याचा परिणाम त्यांच्या रोजच्या जीवनावरही होतो. मध्यम वयात ते वृद्धापकाळात मेंदूच्या उतींचे नुकसान झाल्यामुळे होतो. बोलणे, चालणे, जेवणे, खाणे, अंघोळ करणे, स्वच्छतेच्या क्रिया ही सर्व कामे आपल्या मेंदूच्या काही पॉईंट्समधून नियंत्रित होत असते. अल्झायमरमध्ये अशा पॉईंट्सना इजा होऊन, या कामाच्या सूचना शरीरातील संबंधित अवयवांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम होतो. तसेच विचार करण्याची क्षमता कमी होणे, माणसांचे नाव , चेहरे विसरणे असे परिणाम दिसून येतात. तरुणांमध्येही या आजाराचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.
आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारल्यास स्मृतिभ्रशांचा धोका कमी होतो. मन गुंतवून ठेवणे, सतत कामात व्यस्त राहणे, मद्यपान व अमली पदार्थांचे सेवन टाळावे. आहारात ताज्या भाज्या, फळे यांचा समावेश करावा, पुरेशी झोप घ्यावी, नियमित व्यायाम करावा. तणावापासून दूर रहावे, अशा अनेक उपायांनी व चांगली जीवनशैली अंगिकारल्याने अल्झायमरचा धोका कमी होऊ शकतो. अल्झायमर हा पूर्णपणे बरा होत नाही मात्र काही औषधे आणि उपचारांच्या माध्यमातून तो स्थिर ठेवता येतो, म्हणजे तो वाढत नाही.