कॅन्सरने खराब झाला होता जबडा, डॉक्टरांनी पायाच्या हाडापासून बनवला नवा जबडा

| Updated on: May 07, 2023 | 3:24 PM

जबडा तयार करण्यासाठी रुग्णाच्या उजव्या पायाच्या हाडाचा वापर केला गेला. त्या हाडाला जबड्याचा आकार देण्यात आला. ऑपरेशननंतर रुग्णाची प्रकृती सुधारत आहे, त्याला नवे जीवदान मिळाले आहे.

कॅन्सरने खराब झाला होता जबडा, डॉक्टरांनी पायाच्या हाडापासून बनवला नवा जबडा
JAW SURGERY
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने एका रूग्णाला त्याचा जबडा गमवावा लागणार होता. परंतू त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या रूग्णाचा ट्युमर ( cancer tumor ) तर काढून टाकलाच शिवाय त्याला नवीन जबडा ( JAW SURGERY ) देखील दिला आहे. डॉक्टरांनी या रूग्णाच्या पायाच्या हाडाचा वापर करीत जबडा तयार केला असून त्याचा चेहरा आता विद्रुप दिसणार नसल्याने रूग्णाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलणार आहे. उत्तर प्रदेशातील  ( UP ) आग्रा येथील डॉ. सरोजिनी नायडू रुग्णालयात ( SN Medical College ) ही अवघड शस्रक्रिया पार पाडली आहे.

उत्तर प्रदेशातील आगरा येथील एका रूग्णालयात डॉक्टरांनी कॅन्सर रुग्णाच्या जबड्यावर यशस्वी ऑपरेशन केले आहे. या रूग्णाच्या जबड्यातील ट्यूमर काढताना त्याचा जबडाही काढावा लागणार होता. तोंड आणि गळ्याच्या कॅन्सरमुळे जबडा खराब झाला होता. या ट्युमरला काढताना जबडाही काढावा लागणार होता. आगरा येथील डॉ. सरोजिनी नायडू मेडीकल कॉलेजात रूग्णाच्या पायाचा वापर करीत त्याच्या जबड्याचे पुनर्निमाण करण्यात आले.

डॉक्टरांनी सांगितले की जबड्याच्या सर्जरीनंतर आता रुग्णाची तब्येत आता संपूर्णपणे बरी आहे. मेडीकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत गुप्ता यांनी सांगितले. या रुग्णावर अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. आता कोणत्याही रुग्णाला अशा प्रकारच्या सर्जरीसाठी बाहेर जाण्याची गरज नाही. कान-नाक-घसा (ENT )विभागाचे सह अधिष्ठाता डॉ. अखिल प्रताप सिंह यांनी कॅन्सरग्रस्त जबड्याचे ऑपरेशन करीत त्याला हटवले. त्यानंतर प्लास्टीक सर्जरी विभागाचे डॉ. प्रणय सिंह चकोटीया यांनी त्याच्या जबड्याचे रोपण केले.

उजव्या पायाच्या हाडाचा वापर

जबडा तयार करण्यासाठी रुग्णाच्या उजव्या पायाच्या हाडाचा वापर केला गेला. त्या हाडाला जबड्याचा आकार देण्यात आला. त्या हाडात रक्तप्रवाह स्थापित करण्यासाठी त्याला मानेच्या नसांशी मायक्रोवस्कुलर पद्धतीने पुन्हा जोडले गेले. अशा प्रकारच्या सर्जरीला फ्री टीश्यू ट्रान्सफर किंवा फ्री फिबुला फ्लॅप रिकंन्ट्रक्शन म्हटले जाते. या सर्जरीने चेहऱ्यावर कोणतीही विकृती रहात नाही.