नवी दिल्ली – ज्यांना स्पष्ट दिसत नाही (eyesight) असे जगातील एक चतुर्थांश लोक भारतात राहतात. नॅशनल प्रोग्रॅम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस (NPCB) द्वारे तयार केलेल्या अभ्यासानुसार, जगातील सर्वाधिक 39 दशलक्ष लोकांच्या तुलनेत देशात सुमारे 12 दशलक्ष लोकांमध्ये दृष्टीदोष (eye problem) आहेत. आपल्या आरोग्याप्रमाणेच आपली दृष्टीही वयाबरोबर खराब होत जाते. याशिवाय आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक सवयींमुळे आपल्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. त्या हानिकारक सवयी (bad habits for eyes) कोणत्या हे जाणून घेऊया.
दृष्टी कमजोर होण्याची कारणे
1) जास्त वेळ स्क्रीन पाहणे
आजकाल सर्व लोकांकडे टीव्ही, संगणक, स्मार्टफोन, टॅब्लेट असतात. बहुतांश लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ स्क्रीनवर घालवतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीवर ताण येतो व भविष्यात त्यांचा गंभीर परिणाम होऊ शकतो. जे लोक स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात ते फार ॲक्टिव्ह नसतात आणि शारीरिक व्यायामही कमी करतात. त्यामुळे तुम्ही आणि तुमची मुलं स्क्रीनवर किती वेळ घालवताय, याकडे लक्ष द्या.
2) अती धूम्रपान करणे
धूम्रपान अतिशय घातक आहे, त्याची सवय असेल तर लगेच सोडावी. धूम्रपान आपल्या फुफ्फुसासाठी आणि हृदयासाठी जेवढे हानिकारक आहे, तेवढेच हानिकारक डोळ्यांसाठीही आहे. धूम्रपानामुळे दृष्टी कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांमध्ये दृष्टी कमी होण्याचे प्रमुख कारण कॅन्सर आहे, जो धूम्रपानामुळे होऊ शकतो.
3) आरोग्याच्या इतर समस्यांकडे लक्ष द्या
जर तुम्ही मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, थायरॉईड यांसारख्या दीर्घकालीन आजारांची काळजी घेतली नाही तर तुमची दृष्टी हळूहळू खराब होऊ शकते. 40 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीची लक्षणे सामान्य असतात.
4) पुरेशी झोप न घेणे व व्यायाम न करणे
झोपेच्या कमतरतेमुळे डोळे कोरडे होणे, लाल डोळे, डोळ्याखाली काळी वर्तुळे, डोळ्यात क्रॅम्प्स येणे आणि प्रकाशाची संवेदनशीलता अशी गुंतागुंत दिसून येतात. झोपेची कमतरता ही शारीरिक बदलांशी देखील जोडली गेली आहे. त्याचप्रमाणे, घरात राहणे आणि कोणताही व्यायाम न करणे यामुळेही दृष्टी कमकुवत होते.
5) हायड्रेटेड न राहणे
आपल्या शरीरासाठी पाणी खूप आवश्यक आहे. शरीराचे कार्य सुरळीतपणे चालावे यासाठी पाण्याची गरज असते. पाणी, अश्रूंच्या रूपात, आपले डोळे ओले ठेवण्यास देखील मदत करते. वातावरणातील धूळ, अशुद्धता आणि इतर कण आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचणे स्वाभाविक आहे. डोळ्यांमध्ये ओलावा नसल्यास डोळे कोरडे होणे, लाल होणे किंवा सुजणे असा त्रास होऊ शकतो.
अशी घ्या डोळ्यांची काळजी
– हिरव्या भाज्या आणि मासे यासारखा पौष्टिक आहार घ्या. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पौष्टिक आहार महत्वाचा ठरतो.
– जास्त वेळ मोबाईल, टीव्ही अशा स्क्रीनवर घालवू नका. डोळ्यांवर पडणारा ताण कमी करा.
– नियमित व्यायाम करा आणि भरपूर पाणी प्या.
– डोळ्यांची नियमितपणे तपासणी करत रहा.
– प्रखर सूर्यकिरणांचा डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. ऊन्हात बाहेर जाताना योग्य चष्मा अथवा गॉगल आठवणीने वापरा.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)