नवी दिल्ली : आज 25 एप्रिल रोजी ‘जागतिक मलेरिया दिवस’ (World Malaria Day) जगभरात साजरा केला जातो. ॲनोफिलीस हा मादी डास चावल्याने मलेरियाचा (Malaria disease) आजार होतो. मलेरियावर वेळेवर उपचार सुरू केल्यास रुग्ण 2 ते 5 दिवसांत बरा होऊ शकतो. सामान्य मलेरिया झाल्यानंतर एखादी व्यक्ती लवकर बरी होते. पण मलेरियाची स्थिती गंभीर असेल तर त्याबाबतीत, रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. मलेरियामध्ये औषधांसोबतच आहार योग्य (medicines and proper diet) ठेवला तर शरीराला ताकद मिळते. रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.
मलेरियाची लक्षणे काय असतात ते जाणून घेऊया
1) मलेरिया झालेल्या रुग्णाला तीव्र तापासोबत डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. यासोबतच शरीर दुखणे तसेच संपूर्ण स्नायू दुखणे असा त्रासही होऊ शकतो.
2) मलेरियाच्या रुग्णांना खूप ताप येतो तसेच अंगाची थरथरही वाढते. ताप आल्यामुळे रुग्णाला खूप थंडी वाजते.
3) मलेरिया झालेल्या रुग्णाला थकवा आणि बेचैनी वाटत रहाते. जर तुम्हालाही असा त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे.
4) मलेरियाच्या रुग्णांना जुलाबाचा त्रासही जाणवू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटण्यासोबत उलट्या होत असतील आणि रात्री घाम येत असेल तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांना भेटावे.
मलेरियाचे निदान
मलेरियाची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. लॅब टेस्टद्वारे मलेरियाचे निदान होते. यासाठी मलेरिया पॅरासाइट आणि मलेरिया अँटीजेन चाचणी केली जाते. या चाचण्यांद्वारे, एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचा मलेरिया झाला आहे, हे समजू शकते. जर सामान्य मलेरिया झाला असेल तर त्यावर योग्य उपचार केले तर ती व्यक्ती तीन ते पाच दिवसात बरी होऊ शकते. जर औषध योग्य असेल, डोस अगोदर दिला असेल आणि रेझिस्टेंट मलेरिया नसेल तर व्यक्ती लवकर बरी होऊ शकते.