नवी दिल्ली : किडनी आपल्या शरीराचा महत्वाचा अवयव आहे. त्याचे आरोग्य उत्तम राखणे आपल्या हातात आहे. दोन किडन्यांनी काम करणे बंद केले तर आपण जगूच शकणार नाही. त्यामुळे किडन्यांचे आरोग्य जपणे महत्वाचे आहे. आपण जो आहार घेतो त्यातून अनेक वेळा टॉक्सीन पदार्थ ही पोटात जात असतात. हे टॉक्सिन रक्तात जमा होते. रक्ताची गाळण करण्याचे काम किडनी करीत असते. रक्तातील टॉक्सिन गाळून ते मूत्राद्वारे बाहेर टाकण्याचे काम किडन्या करीत असतात.
अशा प्रकारे किडनी एखाद्या गाळणीचे काम करीत असते. सर्व प्रकारच्या टाकाऊ पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम किडन्या करीत असतात. त्यांचे आरोग्य राखणे महत्वाचे असते. जर टाकाऊ घटक शरीराबाहेर पडणे बंद झाले तरी आपले आरोग्य बिघडू शकते. म्हणून किडनीचे आरोग्य जपायला हवे आहे.
किडनीचे कार्य काय आहे…
पुण्याच्या सह्याद्री रूग्णालयातील मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. सचिन पाटील यांच्या मते किडनी आपल्या शरीरातील टाकाऊ घटकांना बाहेर काढत असते. शरीरातील तरल पदार्थांचे ती संतुलन राखत असते. शरीरातील अतिरिक्त सोडीयम, फॉस्फरस, पाणी, मीठ, पॉटेशियम आदी पदार्थ ती बाहेर टाकते. आपल्या शरीरातील रक्त दिवसातून चाळीस वेळा किडनीद्वारे फिल्टर होत असते. आपल्या शरीरातील ह्दयातून निघणाऱ्या रक्तापैकी 20 टक्के रक्त किडनीत पोहचते. आणि किडनी 24 तास ते गाळण्याचे काम करीत असते. किडनी सोडीयम, कॅल्सियम, मिनरल्स, पाणी, फॉस्फरस, हिमोग्लोबिनचे संतूलन राखत असते.
लघवीचे कार्य बिघडणे –
शरीरातील टाकाऊ घटक लघवीतून बाहेर पडत असतात. लघवीचे प्रमाण कमी किंवा जास्त होणे, लघवीचा रंग बदलणे, लघवीला वास येणे, किडनीवर लोड आल्यास लघवीतून प्रोटीन जाऊ लागते. तेव्हा लघवीला खूप फेस येतो.
पायांना सूज – किडनीचे कार्य बिघडल्यास हिमोग्लोबिनचे संतुलन बिघडते. त्यामुळे पायांना सूज येते. डोळ्यांच्या खाली सूज येते. त्यामुळे थकवाही वाढतो.
भूक कमी लागणे –
जेव्हा किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ काढण्याचे काम थांबवते तेव्हा तेव्हा ते शरीरात साठू लागतात. त्यामुळे उलटी होते, वजन कमी होते, पोटात दुखते, भूक कमी लागते.
एकाग्रता कमी होते –
आपले मन कशात लागत नाही, एकाग्रता कमी लागते, आणि अचानक माणूस बेशुद्ध होऊ शकतो.
दम लागणे –
काहीवेळा किडनी फंक्शन नीट न झाल्यास फप्फुसांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे श्वास घेण्यास वेळ लागू शकतो.
स्किनवर रॅशेस –
जर रक्त शुद्धीकरण होत नसेल तर त्वचेवर चट्टे उमटू शकतात, खाज येऊ शकते.
इम्युनिटी कमजोर होणे –
किडनी खराब झाल्यास इम्युनिटीही कमजोर होते, त्यामुळे इंफेक्शन होण्याचा धोका वाढतो.
किडनीचा आजार झाल्यावर काय करावे –
किडनीचा आजार झाल्यास नेफ्रोलॉजीस्टना भेटावे तसेच किडनी फंक्शनच्या चाचण्या कराव्यात. सोनोग्राफी केल्यास किडनीचा आकार, किडनी स्टोन असेल तर कळू शकते. तसेच आपले राहणीमान बदलावे, रोज व्यायाम करावा, पेन किलरच्या गोळ्या डॉक्टरांच्या शिवाय मनाप्रमाणे खाऊ नयेत. शुगर किंवा बीपीचा त्रास असेल तर त्याच्याउपचार करावा. मेडीटेशन, योगा, श्वासाचे व्यायाम करावा.