नवी दिल्ली – डिप्रेशन…. (depression) हा शब्द तुम्ही बराच वेळा ऐकला असेल पण त्याच्या गंभीरतेबद्दल कदाचित तुम्हाला जास्त माहिती नसेल ! हा आजार वेळप्रसंगी खूप गंभीर होऊही शकतो. डिप्रेशनची ही समस्या (आजकाल) सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसत असून त्याची लक्षणेही (different symptoms) वेगवेगळी दिसतात. कोणत्याही शारीरिक अथवा मानसिक समस्येची सुरूवात झाल्यानंतर काही बदल दिसून येतात, असं म्हणतात. डिप्रेशन असलेली व्यक्ती वेगवेगळ्या त्रासांचा अथवा समस्यांचा सामना करत असते, मात्र त्याबद्दल कोणालाही सांगू शकत नाही. आज आपण पुरूषांमध्ये दिसणारे डिप्रेशन, (depression in men) त्याची लक्षणे व उपचार याबद्दल जाणून घेऊया.
पुरूषांमधील डिप्रेशन (नैराश्य) कसे ओळखावे ?
वर्तणुकीतील लक्षणे अथवा बदल
पुरुषांमध्ये दिसणाऱ्या वर्तणुकीशी संबंधित लक्षणांमध्ये जास्त मद्यपान, अंमली पदार्थांचे व्यसन लागणे, कुटुंबातील व्यक्ती किंवा प्रिय व्यक्तींपासून दूर राहणे, ब्रेक न घेता सतत जास्त काम करणे, नातेसंबंधांमध्ये आक्रमकता दाखवणे, काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलन न ठेवता येणे, खूप व्यस्त राहणे, असुरक्षित लैंगिक संबंध, आत्महत्येचे विचार मनात येणे, अशी लक्षणे दिसून येऊ शकतात.
भावनिक लक्षणे
स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भावनिक लक्षणे वेगळ्या प्रकारे दिसू शकतात. नैराश्याने ग्रस्त असलेल्या बहुतांश स्त्रिया आपल्या समस्या दुःखाच्या रूपात व्यक्त करतात, मात्र पुरूष हे बरेच वेळा असं करू शकत नाहीत. त्यामुळेच पुरूषांमध्ये जास्त राग, निराशा, चिडचिड, फ्रस्ट्रेशन यांसारखी लक्षणे दिसून येतात.
शरीरात होणारे बदल आणि लक्षणे
नैराश्याचा त्या व्यक्तीवर मानसिक परिणाम होत असला, तरी काही शारीरिक समस्याही दिसू शकतात. ज्या पुरूषांना डिप्रेशनचा त्रास असेल त्यांच्यामध्ये डोकेदुखी, पचनाच्या समस्या, छातीत जडपणा जाणवणे, खूप थकवा येणे , झोप न लागणे किंवा खूप जास्त झोप लागणे, वजन कमी होणे, अशी लक्षणे दिसू शकतात.
डिप्रेशनपासून बचावासाठी उपाय
डिप्रेशनच्या उपचारांसाठी डॉक्टर्स काही आवश्यक ती औषधे लिहून देऊ शकतात किंवा थेरेपी अथवा काऊन्सिलिंगची (समुपदेशन) मदत घेता येऊ शकते अथवा त्याचा अवलंब करता येऊ शकतो. तसेच जीवनशैलीत आरोग्यपूर्ण बदल करून डिप्रेशनचा त्रास कमी करता येतो किंवा त्यावर मात करता येते. म्हणूनच दैनंदिन दिनचर्येत योगासने किंवा मेडिटेशनचा समावेश केला पाहिजे. डिप्रेशनची समस्या टाळण्यासाठी आवडता छंज जोपासू शकता, नृत्य शिकणे, गाणे शिकणे किंवा ड्रायव्हिंग, चित्र काढणे, अशा व इतर आवडीच्या कामात सहभागी होऊ शकता. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे योग्य प्रकारे पालन केल्यास लवकर फायदा मिळू शकतो.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)