नवी दिल्ली – आजच्या युगात माणसाची जीवनशैली अशी बनली आहे की हृदयाच्या आरोग्याची (heart care) काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आता तरूणांनाही हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर अवस्थेतून जावे लागते, तर काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती क्वचितच दिसायची. सगळ्यात भयंकर म्हणजे सायलेंट हार्ट ॲटॅक (silent heart attack) . ही अशी परिस्थिती आहे की त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराची लक्षणे (symptoms of heart disease) देखील कळत नाहीत. कधी कधी हा सायलेंट ॲटॅक जीवघेणा ठरू शकतो. नुकतेच सायलेंट हार्ट ॲटॅकची अशी घटना समोर आली आहे, ज्याने डॉक्टरांनाही धक्का बसला आहे.
दिल्लीतील एक 42 वर्षीय व्यक्ती एका फॅमिली फंक्शनसाठी कारने जात होती. त्या व्यक्तीला ना मधुमेह किंवा बीपी यापैकी कोणतीच समस्या नव्हती. असे असतानाही कार चालवत असताना त्या व्यक्तीला हार्ट ॲटॅक आला. घाईघाईत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात जाताच ती व्यक्ती बेशुद्ध पडली. रुग्णालयात त्यांना ताबडतोब व्हेंटिलेटरवर ठेवले आणि सीपीआर आणि वेगवेगळ्या प्रकारचे शॉक ट्रीटमेंट देण्यास सुरुवात केली, पण त्या व्यक्तीच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. हे प्रकरण अधिक गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले.
रुग्णालयात तपासणी दरम्यान हृदयाच्या धमन्यांमध्ये आढळले ब्लॉकेज
अपोलो येथील वरिष्ठ डॉक्टरांनी यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. डॉक्टरांनी सांगितले की, त्या रुग्णाला अपोलोमध्ये आणताच त्याची अँजिओग्राफी करण्यात आली. त्याच्या हृदयाच्या धमन्या 90 ते 100 टक्के ब्लॉक झाल्याचं अँजिओग्राफीतून समोर आलं. रुग्णाची तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली.
अँजिओप्लास्टी केल्यानंतर रुग्णाचे हृदय पुन्हा सामान्य स्थितीत धडधडू लागले. प्रकृती बरी झाल्यावर रुग्णाला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. रुग्णाच्या प्रकृतीत आणखी सुधारणा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता रुग्णाचे 60 टक्के हृदय सामान्यपणे काम करत आहे.
अपोलो रुग्णालयातील आणखी एक वरिष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, या रुग्णाची प्रकृती मिनिटा-मिनिटाला खालावत असल्याने ही एक अतिशय गंभीर घटना बनली होती. रुग्णाला सतत वेंट्रिक्युलर फायब्रिलेशनचा त्रास होत होता. सगळे प्रयत्न करूनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होताना दिसत नव्हती.
वेळेत उपचार झाले नसते तर उद्भवली असती गंभीर परिस्थिती
डॉक्टरांनी पुढे सांगितलं की जेव्हा त्यांना अपोलोमध्ये आणण्यात आले तेव्हा त्यांच्यावर जलद उपचार करणे सर्वात महत्त्वाचे होते. अँजिओप्लास्टीच्या वेळीही डॉक्टर त्याला सतत मसाज आणि शॉक देत होते. डॉक्टर पुढे म्हणाले की, सायलेंट हार्ट ॲटॅकची अशी घटना तरुणांमध्ये क्वचितच पाहायला मिळते.
डॉक्टरांनी सांगितले की, तुमच्या धमन्यांमध्ये 30 ते 40 टक्के प्लेक असू शकतो, ज्यामुळे रुटीन ॲक्टिव्हीटी दरम्यान अशी लक्षणे उद्भवू शकत नाहीत. अर्थात कोलेस्ट्रॉल नॉर्मल असो वा नसो, पण काही वेळा तणावासारख्या गोष्टींमुळे प्लेक वाढतो, त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या उद्भवते आणि या गुठळ्या वाढायला वेळ लागत नाही आणि रक्तवाहिन्यांपर्यंत होणारा रक्तप्रवाह थांबतो.
सायलेंट हार्ट ॲटॅक येऊ शकतो, हे कसे समजावे ?
जेव्हा तुम्हाला पोटाच्या वरच्या भागात किंवा छातीच्या मध्यभागी 20-25 मिनिटे तीव्र वेदना होत असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. अशा परिस्थितीत ईसीजी करावा, त्याला जास्त वेळ लागत नाही आणि ते फार खर्चिकही नसते.
सायलेंट हार्ट ॲटॅकचा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतो. काही लोकांची वेदना सहन करण्याची क्षमता अधिक असते आणि त्यामुळे ते सौम्य वेदनांकडे, किंवा अस्वस्थतेकडे किरकोळ दुखणे समजून दुर्लक्ष करतात. तर काही लोक असे आहेत ज्यांना हृदयविकाराच्या सौम्य लक्षणांबद्दल माहिती नसते. विशेषतः जेव्हा थोड्या काळासाठी वेदना होतात तेव्हा हे लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. गॅसेसचा त्रास समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण हळूहळू हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज वाढत जाते. जेव्हा ते 90 टक्क्यांपेक्षा जास्त वाढते, तेव्हा अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि अशा अनेक प्रकरणांमध्ये मृत्यूचा धोका अधिक संभवतो.