नवी दिल्ली : मूत्राशयातील पेशी, पोकळ आणि फुग्याच्या आकाराचा अवयव अनियंत्रितपणे वाढतो तेव्हा मूत्राशयाचा कर्करोग किंवा युरिनरी ब्लॅडर कॅन्सर होतो. मूत्राशय हे ओटीपोटाच्या खालच्या भागात असते, त्यामध्ये लघवी साठवली जाते. जेव्हा मूत्राशयाचा कर्करोग (Urinary bladder cancer) होतो. तेव्हा त्याच्या स्नायूंच्या भिंतीचे अस्तर कोमेजण्यास सुरुवात होते. यूकेमधील ॲक्शन ब्लॅडर कॅन्सर, यांनी केलेल्या अभ्यासानुसार, या कॅन्सरच्या बहुतेक केसेस अथवा प्रकरणांपैकी 25 टक्के केसेसचे निदान अगदी (late stage) उशीरा होते.
विशेषत: महिलांमध्ये हे (उशीरा निदान) दिसून येते, ज्यामुळे जीवघेणी गुंतागुंत निर्माण होते. डॉक्टरांचे (doctors) असेही म्हणणे आहे की, सुरुवातीच्या अवस्थेतील मूत्राशयाच्या कर्करोगांपैकी सुमारे 75 टक्के (प्रकरणांत) कॅन्सर परत येऊ शकतो.
जरी मूत्राशयाचा कर्करोग हा कॅन्सरचा तुलनेने दुर्मिळ प्रकार असला, तरीही हा कॅन्सर असलेल्या लोकांनी त्यांच्या हेल्थकेअर प्रोव्हायडर्स ( प्रदाते) यांच्याकडे पाठपुरावा करण्याबाबत जागरुक असले पाहिजे.
ब्लॅडर कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे
युरिनरी ब्लॅडर कॅन्सरची नेहमी खूप लक्षणे दिसत नाही आणि त्यामुळेच बऱ्याच लोकांच्या बाबतीत, उशीर झाला की या रोगाचे निदान होते. काही सामान्य लक्षणे आहेत ज्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये आणि ती लक्षात आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लघवीतून रक्त येणे
लघवीतून रक्त येणे हे मूत्राशयाच्या कर्करोगाच्या सर्वात सामान्यपणे दिसणार्या लक्षणांपैकी एक आहे. हॅमाटुरिया म्हणूनही हे ओळखले जाते. ही स्थिती सहसा वेदनारहित असते आणि सहज लक्षात येते. जर तुम्हाला तुमच्या लघवीमध्ये रक्ताचे ठिपके दिसले किंवा लघवी तपकिरी होत असेल, तर त्याची त्वरित तपासणी करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तथापि, ब्लॅडर कॅन्सर ॲडव्होकेसी नेटवर्कनुसार, स्त्रिया हेमॅटुरियाकडे लक्ष देण्याची शक्यता कमी असते कारण ते सामान्यतः सामान्य स्त्रीरोगविषयक समस्यांशी जोडले जाते.
वेदना आणि जळजळ
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनप्रमाणे, काही त्रासदायक लघवीची लक्षणे ही ब्लॅडर कॅन्सरशी संबंधित आहेत. यातील सर्वात सामान्य लक्षण म्हणजे लघवी करताना वेदना आणि जळजळ होणे. हे डिस्युरिया म्हणूनही ओळखले जाते, लघवी करताना जळजळ किंवा संवेदना बहुतेक पुरुषांमध्ये जाणवते.
अनपेक्षित रित्या वजन घटणे
मूत्राशयाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे अनपेक्षित वजन कमी होणे आणि भूक न लागणे. शरीरातील निरोगी पेशी मरतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते तेव्हा हा त्रास होतो.
पायांवर सूज
शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकले जातात. लघवी तयार करण्यासाठी ब्लॅडर आणि किडनी एकत्र काम करतात. तुमच्या किडनीमधून
लघवी ही ब्लॅडरमध्ये वाहून जाते, जे यूरोथेलियम नावाच्या ऊतींनी बांधलेले असते. ब्लॅडर जेव्हा लघवीने भरते तेव्हा ते प्रसरण पावते आणि ते रिकामे असल्यावर आकुंचन पावते. पण जेव्हा कर्करोग होतो, तेव्हा मूत्रपिंडांवर अर्थात किडनीवर दबाव येतो, ज्यामुळे त्यांचे कार्य खराब रितीने सुरू असते. त्यामुळे पायांमध्ये नीट रक्ताभिसरण होत नाही व पायांवर सूज येते.
पाठ दुखणे
युरिनरी ब्लॅडर कॅन्सर शरीरात वाढू लागल्यावर पाठीच्या खालच्या भागात दुखू लागतो. वेदना सामान्यतः पाठीच्या एका बाजूला असते, परंतु ती मध्यभागीही असू शकते. एकदा ट्यूमरचा आकार वाढला किंवा कर्करोगाच्या पेशी तुमच्या शरीराच्या इतर भागात पसरू लागल्या की पाठीच्या खालच्या भागात दुखू शकते.
इतर लक्षणे
जेव्हा कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढतो किंवा ब्लॅडर पलीकडे जाऊन शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो, तेव्हा तुम्हाला खालीलपैकी काही लक्षणे दिसू शकतात.
– लघवी करता न येणे किंवा खूप त्रास होणे
– पोटात वेदना जाणवणे
– हाडांमध्ये वेदना होणे
– शरीर संवेदनशील होणे
– सतत थकवा जाणवणे
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपाय करण्याआधी विषयाशी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)