Vaginal Infection : योनीमार्गाच्या संसर्गाची समस्या (Vaginal Infection) महिलांमध्ये खूप सामान्य आहे. परंतु योनिमार्गाचा संसर्ग भविष्यात गंभीर स्वरूप धारण करतो ज्यामुळे तुम्हाला उठणे आणि बसणे यासारख्या साध्या-साध्या गोष्टी करणेही कठीण होते. आणि याचा सामान्य दिनचर्येवरदेखील परिणाम होऊ शकतो. योनिमार्गाच्या संसर्गास योनि कॅंडिडिआसिस किंवा यीस्ट संसर्ग देखील म्हणतात. योनीमार्गात संसर्ग झाल्यास, योनीत खाज सुटणे, जळजळ होणे आणि पांढरा स्त्राव बाहेर येणे, अशा समस्या लागतो. काही वाईट सवयी या देखील योनिमार्गाच्या संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतात.
आपल्या चांगल्या-वाईट सवयींचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो, त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. योनीच्या संसर्गासाठी कोणत्या सवयी कारणीभूत ठरतात व ते कसे टाळावे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
1) अँटीबायोटिक्सचे अतिसेवन
प्रत्येक किरकोळ शारीरिक समस्यांसाठी तुम्ही अँटीबायोटिक्सचे किंवा औषधांचे सेवन करत असाल तर या सवयीमुळे योनीमार्गात संसर्ग होऊ शकतो. अँटीबायोटिक्सच्या मदतीने बॅक्टेरियाच्या संसर्गावर उपचार करण्यास मदत करते. परंतु अँटीबायोटिक्सच्या अतिसेवनाने योनीमार्गाचे नैसर्गिक संतुलन बिघडते. त्यामुळे हानिकारक बॅक्टेरियाचे प्रमाण वाढू लागते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्सचे सेवन करू नये.
2) जीवशैलीशी निगडीत चुकीच्या सवयी
जीवनशैलीशी संबंधित चुकीच्या सवयी हे देखील योनीमार्गाच्या संसर्गाचे कारण असू शकतात. निरोगी व पोषक आहार न घेणे, यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, शरीर संसर्गाशी लढण्यास सक्षम रहात नाही. त्यामुळे योनीचे आरोग्य सुधारायचे असेल तर आहारात संपूर्ण धान्य, भाज्या आणि ताजी फळे यांचा समावेश करा. तसेच पुरेशी झोप न घेणे, ताण घेणे या सवयींमुळेही रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते आणि योनीमार्गात संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करा.
3) घट्ट अंतर्वस्त्र घालणे
जर तुम्ही खूप घट्ट अंतर्वस्त्र घालत असाल तर हवेचा प्रवाह रोखला जाईल आणि बॅक्टेरिया वाढू शकतील. नेहमी योग्य, सुती कापड असलेली व सैलसर अंडरवेअर घाला. याशिवाय काही स्त्रिया उन्हाळ्यात घाम आला तरी तीच अंतर्वस्त्र घालतात, यामुळेही योनीमार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यासाठी कोरडी व सुती अंडरवेअर घाला. तसेच मासिक पाळी दरम्यान अतिरिक्त अंडरवेअर सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला घाणेरडी अंतर्वस्त्र किंवा अंडरवेअर घालावे लागणार नाही.
4) सुगंधी उत्पादनांचा वापर
जर तुम्ही नेहमी योनिमार्गाच्या संसर्गाला बळी पडत असाल तर याचे कारण सुगंधित उत्पादनांचा अतिवापर हे असू शकते. अनेक स्त्रिया योनिमार्गात सुगंधित साबण किंवा स्प्रे यांचा वापर करतात. या चुकीच्या सवयीमुळे योनीचे पीएच संतुलन बिघडते. महिलांनी योनीमार्गाची स्वच्छता करण्यासाठी कोमट पाणी आणि सुगंध नसलेला साबण वापरावा, असे तज्ज्ञ सांगतात.
5) सार्वजनिक शौचालयांचा जास्त वापर
काही महिला फ्रेश होण्यासाठी कोणतेही (बाहेरचे) टॉयलेट वापरतात. पण जर तुम्ही दररोज सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असाल तर तुम्हालाही संसर्ग होऊ शकतो. सार्वजनिक स्वच्छतागृहे ही तितकीशी स्वच्छ नसतात. त्यामुळे अशा स्वच्छता गृहांचा वापर करायची वेळ आलीच तर नीट काळजी घ्या. सीट सॅनिटाजरचाही वापर करा.