मुंबई, जगभरात अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरॉलॉजिकल आजार (neurological disorders) असतात. त्यामध्ये जागतिक स्तरावर पार्किन्सनचा (Parkinsons) आजार अतिशय वेगाने वाढत चालला आहे. मात्र त्याचा मागोवा घेणे हे कठीण आव्हान आहे. कारण पार्किन्सनची लक्षणे रुग्णांमध्ये खूप उशिरा आढळून येतात. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (MIT) इंजिनिअर्सनी हा आजार ट्रॅक करण्याचा एक मार्ग शोधून काढला आहे. या इंजिनिअर्सनी एक इन-होम डिव्हाइस डिझाइन केले असून या डिव्हाईसचे संशोधन सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झाले आहे. या डिव्हाईसच्या मदतीने घरातील व्यक्तीमध्ये पार्किन्सन या आजाराची लक्षणं ओळखता येतात. विशेषत: जे लोक शहर आणि रुग्णालयांपासून दूर राहतात त्यांच्यासाठी हे डिव्हाईस फायदेशीर ठरेल. याच्या क्लिनिक ट्रायल दरम्यान, इंजिनअर्सनी असा दावा केला आहे की हे डिव्हाइस पार्किन्सनच्या रुग्णाला ओळखू शकते. या डिव्हाइसच्या मदतीने घरच्या घरी पार्किन्सन आजाराचा शोध घेता येईल.
हे नवे डिव्हाईस रुग्णाचा वेग आणि चालणे यावर लक्ष ठेवू शकते,ज्याचा उपयोग पार्किन्सनची लक्षणे आणि औषधांचे मूल्यांकन करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे डिव्हाईस एखाद्या वाय-फाय राऊटरसारखे आहे जे रेडिओ सिग्नलचा वापर करून डेटा गोळा करते. ते घरात कुठेही बसवता येऊ शकते. हे डिव्हाईस व्यक्तीच्या हालचालीच्या वेगाचा मागोवा घेते. ज्यामुळे रुग्णामध्ये हा आजार असल्यास ते आढळून येते. या उपकरणामुळे सर्व रुग्णांचे अधिक चांगले मॉनिटरिंग झाले आहे, असे या अभ्यासात सहभागी असलेल्या दीना कटाबी यांनी सांगितले.
या संशोधनात, 50 सहभागीं लोकांसह त्यांच्या घरी एक वर्षासाठी अभ्यास केला. आणि मिळालेल्या डेटाच्या ट्रॉव्हचे विश्लेषण करण्यासाठी मशीन-लर्निंग अल्गोरिदमचा वापर करण्यात आला. संशोधनादरम्यान, 34 लोकांमध्ये पार्किन्सनची लक्षणे दिसून आली.
पार्किन्सन हा एक न्यूरोलॉजिकल आजार असून त्यामध्ये सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर प्रभाव पडतो. हा आजार सामान्यत: वृद्धांना अधिक होतो. यामध्ये रुग्णाच्या शरीराचा तोल जाऊन त्याला चालण्यास त्रास होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्याची सुरुवात हळूहळू होते, म्हणजेच त्याची लक्षणे कधी दिसू लागली हे कळत नाही. काही आठवडे किंवा महिन्यांनंतर, लक्षणांची तीव्रता वाढते.
या आजारावर सध्या कोणताही नेमका इलाज उपलब्ध नाही. फक्त त्याची लक्षणे कमी केली जाऊ शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगच्या मते, पार्किन्सन रोग हा मेंदूचा विकार आहे. यामध्ये रुग्णाची मानसिक स्थिती बिघडू शकते. या रोगाच्या लक्षणांमध्ये मानसिक आणि वर्तणूकीत बदल होणे, झोपेची समस्या, नैराश्य, एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यास त्रास होणे आणि थकवा येणे अशा लक्षणांचा समावेश आहे.
हा आजार तेव्हा होतो, जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागातील चेतापेशी किंवा न्यूरॉन्स नष्ट होऊ लागतात. सामान्यतः हे न्यूरॉन्स डोपामाइन नावाचे एक महत्त्वाचे मेंदूचे रसायन तयार करतात. जेव्हा हे न्यूरॉन्स मरतात किंवा कमजोर होतात. तेव्हा ते कमी डोपामाइन तयार करतात. त्यामुळे पार्किन्सन रोग होतो.