नवी दिल्ली – आपल्या शरीरात मानेजवळ असणारी थायरॉईड ग्लँड (thyroid gland) ही अनेक प्रकारचे हार्मोन्स (hormones) बनवते. हे हार्मोन्स शरीरातील अनेक क्रिया नियंत्रित करतात. शरीरात थायरॉईड पातळी गरजेपेक्षा जास्त वाढणे किंवा कमी होणे यामुळे थायरॉईड आजार होतो. महिलांमध्ये थायरॉईड रोग खूप सामान्य आहे. या आजारामुळे त्रस्त असलेल्या महिलांचे वजन वेगाने वाढणे किंवा कमी होणे, अशक्तपणा येणे, केस तुटणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र पुरूषांमध्येही थायरॉईडचा (thyroid in men)आजार दिसून येतो. याचा पुरूषांच्या सेक्स लाईफवर किंवा लैंगिक जीवनावरही परिणाम होतो.
थायरॉईड हार्मोनची कमतरता किंवा थायरॉईड नियंत्रणाबाहेर जाणे, या दोन्हीमुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पुरूषांच्या सेक्स लाईफवरही परिणाम होऊ शकतो. थायरॉईड हार्मोनची उच्च पातळी गोनेडोट्रोपिन या हार्मोनच्या उत्पादनावर परिणाम करते, ज्यामुळे स्पर्मच्या (शुक्राणूंच्या) गुणवत्तेवर परिणाम होतो. शुक्राणूंच्या गुणवत्तेतील असामान्यता ही थायरॉईड हार्मोनची कमी पातळीशी किंवा ओव्हर ॲक्टिव्ह (अतिक्रियाशील) थायरॉईडशी संबंधित असते.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, थायरॉईड ग्लँड ही मेटाबॉलिज्म (चयापचय) आणि इतर शारीरिक कार्य नियंत्रित करणारे हार्मोन्सच्या उत्पादनासाठी जबाबदार असते. हायपरथायरॉईडीझम किंवा हायपोथायरॉईडीझमच्या समस्येमुळे पुरुषांमध्ये वीर्याचे प्रमाण आणि स्पर्मची (शुक्राणू) गुणवत्ता खराब होऊ शकते.
हायपोथायरॉईडीझमचा पुरुषांना जास्त त्रास होतो
हायपोथायरॉईडीजम (थायरॉईडची कमी पातळी) असलेल्या पुरूषांमध्ये कमी टेस्टोस्टेरॉन आणि शुक्राणूंची संख्या कमी असण्याची समस्याही दिसून आली आहे. पुरुषांच्या वंध्यत्वाचे मूल्यांकन करताना थायरॉईड चाचण्यादेखील केल्या जातात. या काळात थायरॉईडचा आजार आढळला तर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही या आजाराचा परिणाम होत असल्याचा तो संकेत असतो. उच्च किंवा कमी थायरॉईड पातळीमुळे स्पर्म काऊंट (शुक्राणूंची संख्या) आणि वीर्याची गुणवत्ता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
लैंगिक संबंधांची इच्छा होते कमी
हायपोथायरॉईडीझम असलेल्या पुरुषांमध्ये लैंगिक संबंधांची अथवा सेक्सची इच्छा कमी होते. तथापि, ही लक्षणे हायपर थायरॉईडीझम (वाढलेले थायरॉईड) असलेल्या रुग्णांमध्ये देखील दिसतात. अशा परिस्थितीत, पुरुषांनी थायरॉईडच्या पातळीकडे लक्ष द्यावे, ती कमी होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
असा करा बचाव
– थायरॉईडचा आजार असल्यास औषधे नियमितपणे घ्यावीत.
– दररोज व्यायाम करावा.
– झोपेची आणि उठण्याची एक वेळ निश्चित करावी. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे.
– दररोज किमान सात तासांची झोप घ्यावी.
– वजन कमी करावे.
– नियमितपणे थायरॉईडची चाचणी करून घ्यावी.