नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी (cold wave) आहे. पारा खाली उतरत आहे. अशा स्थितीत सर्वांचीच चिंता वाढली आहे. पण श्वासोच्छवासाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी स्वतःची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांच्यासाठी अशी थंडी अधिक त्रासदायक ठरू शकते. त्यांना तीव्र थंडीत अस्थमा ॲटॅक (asthma attack) म्हणजेच दम्याचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. हिवाळ्यात (winter) असे का होते आणि या ऋतूत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, ते जाणून घेऊया.
या कारणामुळे थंडीत वाढतो अस्थमा ॲटॅकचा धोका
खरंतर, थंडीमुळे श्वसनमार्ग संकुचित होतो. काही वेळा श्वसननलिका इतक्या आकुंचित होताता की नलिका एकदम पातळ होतात किंवा ब्लॉक होतात. त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास खूप त्रास होतो आणि त्यामुळे दम्याचा झटका येण्याचा धोका वाढतो.
अस्थमाच्या रुग्णांनी अशी घ्यावी काळजी
1) तापमान सतत घसरत असेल आणि त्यासोबतच थंड वारेही वाहत असतील तर बाहेर फिरणे किंवा व्यायाम करण्याऐवजी घरच्या घरी हलके-फुलके व्यायाम करा. कारण बाहेरचे हवामान किंवा जिममधील आर्द्रता तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. जेव्हा हवामान उबदार असेल तेव्हाच बाहेर जावे.
2) थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीजवळ बसणे टाळावे , कारण त्यातून निघणारा धूर फुफ्फुसांसाठी धोकादायक ठरू शकतो.
3)प्राणायाम करणे हे दम्याच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे, त्याच्या नियमित सरावाने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. हे डायाफ्रामॅटिक आणि पोटाच्या स्नायूंना सक्रिय करते, ज्यामुळे श्वासोच्छवासाची समस्या दूर होते. कपालभाती, नाडीशोधन, भ्रमरी, भस्त्रिका हे फायदेशीर आहे.
4) चहा, कॉफी, सूप आणि इतर प्रकारचे गरम द्रव पेय प्यायल्याने शरीरात उष्णता तर राहतेच, पण कफची समस्याही दूर होते. श्वास घेणे आरामदायी होते.
5) घराची नियमित स्वच्छता करत रहा. व्हॅक्यूम क्लिनरने साफ करून सर्व धूलीकण काढून टाकावेत. धूर, धूळ, हवेतील कोंड्याचे कण हे देखील दम्याच्या रुग्णांसाठी ट्रिगर म्हणून काम करतात. म्हणूनच एअर फिल्टर्स आणि एअर प्युरिफायरचा नक्कीच वापर करा.