नवी दिल्ली – आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप (sleep) घेतली पाहिजे असा सल्ला तज्ज्ञ देतात. पण पुरेशी झोप घेतल्यानंतरही जर तुम्हाला संपूर्ण दिवस झोप (too much sleep) येत असेल तर हे एखाद्या आजाराचे (disease) लक्षण असू शकते. हे नक्की काय आहे ते जाणून घेऊया.
हायपरसोम्निया म्हणजे काय ?
हायपरसोम्निया (Hypersomnia) हा झोपेशी संबंधित एक विकार आहे ज्यामध्ये रात्री चांगली झोप झाल्यानंतरही सतत झोप येते. स्लीप फाउंडेशनच्या मते, सुमारे 40 टक्के लोकांना हायपरसोम्नियाची लक्षणे दिसतात. याची अनेक कारणे असू शकतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असतील किंवा ताण-तणाव जाणवणे, खूप औषधे घेणे आणि टीव्ही, मोबाईल स्क्रीन यांचा अतिरिक्त वापर यामुळेही हे होऊ शकते. हायपरसोम्नियाचे कारण, लक्षण याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
हायपरसोम्नियाचे कारण
अशी अनेक कारणे असतात, ज्यामुळे खूप जास्त झोप येऊ शकते –
– हायपोथायरॉईड, एसोफेजियल रिफ्लक्स, नॉकटर्नल अस्थमा यामुळेही हायपरसोम्निया होऊ शकतो.
– अल्कोहोल किंवा ड्रग्सचे अतीप्रमाणात सेवन करणे
– शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्यामुळेही सतत झोप येत राहते. यामुळे दिवसभर थकवा जाणवतो आणि जांभई येत राहते.
– खूप जास्त ताण घेतल्यानेही झोप न येण्याची समस्या उद्भवते. तर काही लोकांना ताणामुळे खूप झोपही येऊ शकते.
– हार्मोनल बदलांमुळेही खूप झोप येऊ शकते.
– डोक्याला एखादी इजा झाली किंवा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम मुळेही अधिक झोप येऊ शकते.
– चहा-कॉफीचे अधिक सेवन केल्यास रात्रीच्या झोपेत अडथळा निर्माण होतो. परिणामी दिवसा जास्त झोप येते.
हायपरसोम्नियाची लक्षणे
– सतत थकल्यासारखे वाटणे
– भूक न लागणे
– कोणत्याही कामात लक्ष न लागणे
– जाग आल्यानंतर गोंधळल्यासारखे वाटणे
– रात्री नीट झोप झाल्यानंतरही दिवसा झोपेचा त्रास होणे
– गोष्टी नीट लक्षात न राहणे
– चिडचिड वाढणे
झोप घालवण्याचे उपाय
1) कॉफी प्यावी
झोप घालवायची असेल तर कॉफी पिणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे थेट मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. मन पूर्णपणे फ्रेश होते आणि झोपही पळून जाते. पण खूप जास्त कॅफीन प्यायल्याने नुकसानही होऊ शकते, हेही लक्षात ठेवावे.
2) शरीर हायड्रेट ठेवा
पुरेसे पाणी प्या. निर्जलीकरणामुळे तुमच्या उर्जेची पातळी कमी होऊ शकते आणि तुम्हाला थकवा आणि सुस्ती वाटू शकते. त्यामुळे हायड्रेटेड राहा.
3) व्यायाम करा
लठ्ठपणा हेही अतीझोप येण्याचे म्हणजे हायपरसोम्निया होण्याचे कारण असू शकते. त्यावर मात करण्यासाठी नियमित व्यायाम करा. दररोज अर्धा तास व्यायाम करा आणि शरीर तंदुरुस्त ठेवा.
4) शॉवर घ्या
जर तुम्ही घरी असाल आणि दिवसभर झोपेचा त्रास होत असेल तर तो दूर करण्यासाठी शॉवर घ्या. कोमट पाण्याने आंघोळ करणे हा झोप घालवण्याचा उत्तम मार्ग आहे.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)