नवी दिल्ली – नवं वर्षं सुरू होताना आपल्यापैकी अनेक जण नवे संकल्प (resolution) करतात, काही चांगल्या सवयी अवलंबवायचं ठरवतात. यामध्ये सर्वात वरचा क्रमांक लागतो तो फिटनेसचा. पण कोणत्या व्यायामाने (exercise) याची सुरुवात करावी हे अनेकांना कळत नाही. कोणाला बाहेर आलेलं पोट कमी करायचं असतं तर कोणाला वाढलेलं वजन नियंत्रणात (weight control)ठेवायचं असतं. एखाद्याला बायसेप्स हवे असतात तर कोणाला संपूर्ण बॉडी टोन करायची असते. यामुळे जास्त संभ्रम निर्माण होतो. तुम्हीही नव्या वर्षात फिटनेस रुटीन पाळायचे ठरवले असेल तर काही सोप्या वर्कआऊटबद्दल जाणून घ्या.
हा व्यायाम केल्याने तुम्ही फिट तर रहालच पण तुमच्या आरोग्यासाठीही तो फायदेशीर ठरेल. योग्य डाएटसह हे व्यायाम केल्याने तुमचा संकल्प पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच आजारही दूर राहतील.
जंपिंग जॅक
जंपिंग जॅक हा अतिशय फायदेशीर व्यायाम आहे. हा व्यायाम केल्याने वजन वेगाने कमी होण्यास मदत होते तसेच पोटाची चरबीही कमी होते. मात्र हा व्यायाम सुरू करण्यापूर्वी हाता-पायांचा हलकाफुलका स्ट्रेचिंग व्यायाम करावा, यामुळे इजा होण्याची शक्यता कमी होते.
दोरीवरच्या उड्या मारणे
दोरीवरच्या उड्या मारणे हा देखील सोपा व्यायाम आहे. त्याचा परिणामही खूप कमी दिवसात दिसून येतो. तुम्ही दररोज याचे दोन ते तीन सेट मारण्याचा प्रयत्न करा. चांगल्या सरावानंतर तुम्ही उड्यांची संख्या वाढवू शकता. एका सेटमध्ये किमान 30 ते 50 उड्या मारण्याचा प्रयत्न करा.
स्क्वॉट जंप
संपूर्ण शरीराला टोन करण्यासाठी स्क्वॉट जंप हा देखील एक उत्तम व्यायाम आहे. असे केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतात, त्याचप्रमाणे कमी वेळात भरपूर कॅलरी बर्न होऊ शकतात.
हिवाळ्यात व्यायामाची सर्वोत्तम वेळ
हिवाळ्याच्या दिवसात वर्कआउट करण्याची सर्वात उत्तम वेळ ही सकाळची असते. याचे कारण म्हणजे सकाळी व्यायाम केल्याने शरीरात दिवसभर ऊर्जा राहते. व्यायाम केल्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, जे तुम्हाला दिवसभर ॲक्टिव्ह राहण्यास मदत करतात. थंडीत सकाळी उठून व्यायाम करण्यासाठी आळस सोडणे कठीण असते, पण आपल्या आरोग्याचे भान ठेवून व्यायामासाठी सकाळची वेळ निवडा आणि नियमित व्यायामाने पडणारा फरक पहा.