नवी दिल्ली : हळहळू थंडी कमी होत असून आता उन्हाळ्यानेही (summer) दार ठोठावले आहे. काही दिवसांतच उन्हाळा सुरू होणार आहे. बदलत्या ऋतूमुळे आपल्या जीवनातही बदल होत असतात. उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी लोक अन्न आणि कपड्यांमध्ये अनेक विशेष बदल करतात. उन्हाळ्याच्या हंगामात, कडक उन्हामुळे आणि उष्माघातामुळे लोक आजारी पडतात. यामुळेच उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी शरीराला भरपूर पाण्याची (water) आवश्यकता असते, त्याची पूर्तता होणे महत्वाचे ठरते. अशावेळी उन्हापासून आणि उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, व शरीराला थंड करण्यासाठी लोकं थंड पेये इत्यादींचा अवलंब करतात. पण कोल्डड्रिंक्सचे सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा स्थितीत काही देशी पेयांच्या (homemade drinks) मदतीने तुम्ही उन्हाळ्यात उष्माघातापासून स्वतःला वाचवू शकाल आणि तुम्ही निरोगीही रहाल.
उन्हाळ्यात कोणत्या पेयांचा आस्वाद घेता येईल ते जाणून घेऊया…
पन्हं
उन्हाळ्यात जर तुम्हाला उष्माघाताचा त्रास झाला किंवा तुम्हाला उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करायचे असेल तर कैरीचं पन्हं हे उत्तम पेय ठरतं. कैरीच्या गरापासून बनवलेलं हे पेय तुम्हाला उष्माघातापासून वाचवते. व्हिटॅमिन सी सारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेलं पन्हं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये पुदिना आणि जिरं घालूनही त्याचे सेवन करू शकता.
बेलाचे सरबत
बेल सिरप हे उन्हाळ्यातील एक उत्तम पेय आहे, जे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. उन्हाळ्यात बीटा-कॅरोटीन, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, बी1, बी2, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि फायबरने समृद्ध असलेले हे सरबत प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. याचे सेवन केल्याने तुम्ही उष्माघातापासून स्वतःला तर वाचवू शकताच पण ते पचनासाठीही खूप फायदेशीर मानले जाते.
सत्तूचे सरबत
उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीराला थंड ठेवण्यासाठी सत्तूचे सरबत पितात. कॅलरीज, कार्ब्स, प्रथिने आणि फायबरने समृद्ध असलेले हे सरबत तुमच्यासाठी उन्हाळ्यात उष्माघातापासून वाचवण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. त्यात असे अनेक घटक आढळतात, जे शरीराला उष्माघाताशी लढण्यास मदत करतात. यासोबतच ते एनर्जी ड्रिंकच्या रूपात शरीराला ताकदही पुरवते.
ऊसाचा रस
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी अनेकजण उसाच्या रसाचे सेवन करतात. त्याने तहान भागते आणि उष्माघातापासून वाचवण्यासाठीही ऊसाचा रस उपयुक्त ठरतो. यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले लोह, कॅलरी, साखर आणि फायबर हे आपल्याला उन्हाळ्यात निरोगी ठेवण्यास मदत करते.
ताक
उन्हाळ्यात उष्माघातापासून स्वतःला वाचवायचे असेल आणि शरीरात थंडावा ठेवायचा असेल तर ताक हे एक उत्तम पेय आहे. याच्या सेवनाने शरीरालाच नव्हे तर पोटालाही थंडावा मिळतो. यामध्ये असणारे कॅलरी, कार्ब्स, फायबर आणि प्रोटीन यांसारखे पोषक घटक देखील अनेक समस्यांपासून आराम देतात. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात दररोज ताक पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.