नवी दिल्ली : सध्या हवामान बदलत आहे. अशा परिस्थितीत घराबाहेरील धूळ आणि प्रदूषण (pollution) वाढत असून या हवेमुळे डोळ्यांना खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते. इतकेच नाही तर तासन्तास स्क्रीनसमोर (screen) काम केल्यामुळे डोळे थकल्यासारखे वाटणे, अशा समस्येनेही अनेकांना त्रास होतो. तीव्र सूर्यप्रकाश आणि प्रदूषित हवेमुळे डोळ्यांच्या कोरडेपणाची (dry eyes) समस्या देखील अनेक पटींनी वाढली आहे, जी हळूहळू डोळे थकवण्याचे काम करते. अशा परिस्थितीत आपण घरात राहून काही सोपे उपाय केले तर आपल्या डोळ्यांनान खूप आराम मिळू शकतो. हे उपाय अतिशय प्रभावी आणि तितकेच सोपे देखील आहेत.
डोळ्यांवर जास्त ताण आल्याने डोळ्यांमध्ये जळजळ होणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, डोळे कोरडे पडणे, डोळे पाणावणे, डबल व्हिजन, स्पष्टपणे न दिसणे, मान, खांदे किंवा पाठदुखी अशा समस्या जाणवू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही चांगली झोप घेतली आणि डोळ्यांना पुरेसा आराम दिला तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. त्याशिवाय काही सोपे उपाय देखील फायदेशीर आहेत.
डोळ्यांचा थकवा आणि जळजळ दूर करण्याचे उपाय
थंड पाणी वापरा
डोळ्यांमध्ये जळजळ किंवा थकवा जाणवत असेल तर डोळ्यांवर पाणी शिंपडावे. यामुळे डोळ्यांना थंड आणि बरं वाटेल. तुम्ही हायड्रेशनची काळजी घ्या आणि भरपूर पाणी प्या. यामुळे शरीर डिटॉक्स होईल आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होईल.
काकडीचा वापर
डोळ्यांची जळजळ आणि थकवा हा तुम्ही काकडीच्या मदतीने दूर करू शकता. यासाठी काकडीचे पातळ काप करून फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा जेव्हा डोळ्यांमध्ये जळजळ होईल, तेव्हा हे काप डोळ्यांवर ठेवा. आपले डोळे बंद करा आणि 10 ते 15 मिनिटे विश्रांती घ्या. काकडीमुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.
गार दुधाचा वापर
डोळ्यांना आराम देण्यासाठी तुम्ही गार दुधाचाही वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात थोडं थंड दूध घ्या आणि त्यात कापूस बुडवून डोळ्यांवर ठेवा. काही वेळ डोळे मिटून घ्या आणि नंतर बोटांनी हलका मसाज करा. यामुळे डोळ्यांचा संसर्ग दूर होईल आणि डोळ्यांना फ्रेश वाटेल.
गुलाब पाण्याचा वापर
डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी गुलाबपाणी अवश्य वापरावे. यासाठी कापसाचे बोळे घेऊन त्यावर गुलाबपाणी टाका. आता ते डोळ्यांवर ठेवा. थोडा वेळ झोपा आणि 20 मिनिटांनंतर डोळ्यांवरून काढून टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळेल व थकवाही दूर होईल.