Thick Eyebrows : सध्या घनदाट आयब्रोची फॅशन सुरू आहे. त्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य तर वाढतेच पण आपल्या चेहऱ्यातही बराच फरक दिसतो. लांबसडक आणि घनदाट आयब्रो मिळाव्यात यासाठी महिला बरेच उपाय करतात. काही तर महागड्या ट्रीटमेंटही करून घेतात. मात्र त्या दरवेळेस फायदेशीर ठरतातच असे नाही. अशा वेळी काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही घनदाट आयब्रो मिळवू शकता.
घनदाट भुवयांसाठी करा हे उपाय
– जर तुम्हाला नैसर्गिकरित्या घनदाट भुवया हव्या असतील तर त्यावर एरंडेल तेल लावावे. या तेलाने केसांची वाढ जलद होते. एरंडेल तेलामध्ये प्रथिने, फॅटी ॲसिडस्, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व ही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे केसांचे पोषण होण्यास मदत मिळते. व भुवया घनदाट दिसू लागतात.
– लांबसडक व घनदाट भुवया हव्या असतील तर तुम्ही भुवयांना बदामाचे तेलही लावू शकता. त्यामुळे केस खूप वेगाने वाढू लागतात. रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या बोळ्याने हे तेल भुवयांना लावा. याच्या नियमित वापराने तुमच्या भुवया जाड होऊ शकतात.
– नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई हे मुबलक प्रमाणात असते. भुवयांना हे तेल नियमितपणे लावले तर भुवया घनदाट होण्यास मदत होते. यासाठी रोज कापसाच्या साहाय्याने भुवयांवर खोबरेल तेल लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.
– यासाठी ऑलिव्ह ऑईलही अतिशय उपयुक्त ठरेल. त्याच्या नियमित वापराने भुवया घनदाट होऊ शकतील. ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ज्यामुळे भुवयांच्या केसांची वाढ होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी हे तेल दररोज वापरल्यास फरक दिसून येतो.
– वाचून आश्चर्य वाटेल पण दुधाच्या मदतीनेही भुवयांची वाढ चांगली होऊ शकते. यासाठी एक चमचा कच्चे दूध घेऊन, त्यात कापूस भिजवून तो भुवयांवर लावा आणि ५ ते १० मिनिटे मसाज करा. नियमित वापरामुळे तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसून येईल.
– कांद्याचा रस लावल्यानेही भुवयाही जाड आणि घनदाट होऊ शकतात. दिवसातून दोनदा कांद्याचा रस भुवयांवर लावल्याने फायदा होऊ शकतो.