नवी दिल्ली – आपल्या शरीराचे प्रत्येक अवयव हा खूप महत्वाचा असतो, आणि त्याचे प्रत्येकाचे एक कार्य व महत्व असते. डोळे (eyes) हा आपल्या शरीराचा संवेदनशील आणि अतिशय महत्वाचा अवयव आहे. डोळ्यांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य वाटते. डोळ्यांशिवाय आपले जीवन अंधकारमय होऊ शकते. अशा परिस्थितीत आपण आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घेणे (eye care) अत्यंत आवश्यक आहे. पण आजकाल आपल्या जीवनशैलीचा परिणाम डोळ्यांवरही पडू लागला आहे. पौष्टिक अन्नाचा अभाव आणि स्क्रीनचा सतत वापर (excessive use of screen) यामुळे आपली दृष्टी कमी होऊ लागली आहे. जर तुम्हालाही काही गोष्टी अंधुक दिसू लागल्या असतील तर तुम्ही या घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
आवळा
आजकाल ऑफिसच्या कामामुळे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा सतत वापर करावा लागतो. त्यामुळे आपल्या डोळ्यांवर आता घातक परिणाम होत आहेत. जर तुम्हालाही काही गोष्टी अंधुक दिसू लागल्या असतील तर याचा अर्थ तुमची दृष्टी कमी होत आहे. अशा परिस्थितीत हा रोग बरा करण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरेल. व्हिटॅमिन-सीने समृद्ध असलेला आवळा खाणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. मुरंबा, रस किंवा चटणीच्या स्वरूपात तुम्ही तो खाऊ शकता.
बदाम
अनेक पोषक तत्वांनी युक्त असलेले बदाम हे आपल्या मेंदूसाठी फायदेशीर तर आहेतच पण त्यांच्या सेवनाने दृष्टीही सुधारते. जर तुम्हालाही दृष्टी कमी होण्याचा त्रास होत असेल तर यासाठी बदामाचे सेवन फायदेशीर ठरेल. डोळ्यात पाणी येत असेल किंवा डोळे लाल होत असतील तर रात्री 6 ते 8 बदाम भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास फायदा होईल.
अंजीर व मनुका
अंधुक दिसत असेल तर अंजीर व मनुकांचे सेवन फायदेशीर ठरते. दृष्टी वाढवण्यासाठी 10 ते 12 मनुका आणि 2 अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते रिकाम्या पोटी खा. असे नियमित केल्याने तुम्हाला लवकरच फायदे दिसून येतील.
बदाम, बडीशोप आणि खडीसाखर
डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी तुम्ही बदाम, बडीशेप आणि खडीसाखरेचे सेवन देखील करू शकता. यासाठी बदाम, डीशेप आणि खडीसाखर एकत्र बारीक करून घ्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण दुधात घालून प्यावे. नियमित सेवनाने फरक दिसून येईल.
गुलाबपाणी
त्वचेसाठी फायदेशीर असलेले गुलाबपाणी आपल्या डोळ्यांसाठीही उपयुक्त असते. जर तुम्हाला तुमची दृष्टी वाढवायची असेल तर झोपण्यापूर्वी डोळ्यात गुलाब पाण्याचे तीन थेंब टाका. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा असे केल्याने तुम्हाला फायदा होईल. मात्र, ते वापरण्यापूर्वी, एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)