नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : आजकाल बरेचसे लोकं लॅपटॉप (Laptop) किंवा मोबाईल फोनवर (Phone) जास्त वेळ घालवतात. ऑफीसव्यतिरिक्तही लोकं लॅपटॉप आणि मोबाईलवर फिल्म, रील्स, सोशल मीडियाचा वापर करत असतात. मोठी माणसं असोत की लहान मुलं सगळ्यांचाच फोनचा वापर वाढला आहे, हे सध्याचं चित्र आहे. मात्र या सर्वांमुळे आपल्या डोळ्यांवर खूप ताण (strain on eyes) येऊन ते थकतात. एवढेच नव्हे तर काही वेळेस डोळे कोरडे होणे, खाज सुटणे किंवा डोळे जळजळणे असा त्रासही होत असतो.
या सर्वांपासून सुटका हवी असेल तर डोळ्यांची नीट आणि खास काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. डिजीटल स्ट्रेन कमी करण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया.
कामात मध्ये-मध्ये घ्या ब्रेक
डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी कामात अधेमधे ब्रेक घेत राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. ऑफिस असो की घर, ब्रेक घेणं खूप गरजेचं असतं. दर अर्ध्या तासाने स्क्रीनवरून ब्रेक घ्या. एवढेच नाही तर जरा इकडे तिकडे नक्कीच फेरफटका मारा. पण ब्रेकवर असताना मोबाईल कधीच वापरू नका. यामुळे डोळ्यांवरील स्क्रीनचा प्रभाव कमी होईल. ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होऊ शकेल.
डोळे पापण्या मिचकावत रहा
काही जण त्यांच्या कामात इतके गुंग होतात, की (कधीकधी ) ते डोळे किंवा पापण्या मिचकावणेच विसरून जातात. पण पापण्या मिचकावणे अत्यंत महत्वाचे असते, कारण त्यामुळे डोळ्यांवर पडणारा दाब कमी होतो. तसेच त्यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होऊन जळजळही होत नाही. डोळ्यांमधील ओलावाही कायम राहतो. डोळे कोरडे पडण्याची समस्या उद्बवत नाही.
स्क्रीन लाइटची घ्या विशेष काळजी
फोन आणि लॅपटॉपच्या स्क्रीनचे लाईटिंग योग्य ठेवा, यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल. अनेक वेळा लोक कमी किंवा अपुऱ्या प्रकाशात काम करतात, पण त्यामुळे आपल्याच डोळ्यांवर जास्त ताण येतो. जर तुम्ही कमी प्रकाशात सतत काम करत असाल तर त्यामुळे डोळ्यांवर खूप ताण येऊ शकतो. त्यामुळे मॉनिटरचा प्रकाश योग्य ठेवा. त्यामुळे डोळ्यांवर कमी दाब पडतो.
गार पाण्याने धुवा डोळे
रिलॅक्स व्हायचे असेल तर गार पाण्याने डोळे धुवावेत. थंड पाण्याचा हबकारा डोळ्यांवर मारल्याने फ्रेश वाटते आणि काम करण्यासही त्रास होणार नाही.
डोळ्यांना करा मसाज
डोळ्यांना हळूवार हातांनी मसाज केल्यास स्ट्रेसपासून सुटका होऊ शकते. काही वेळासाठी डोळे मिटा व हलक्या हाताने मसाज करा. यामुळे बरेच रिलॅक्स वाटते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)